शिष्याला ज्ञान देताना गुरूंची भावना अहंकाराची नसावी – पद्माकर कुलकर्णी
मेहता प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमे निमित्त घरोघरी -*विद्यार्थ्यांनी केले आई-वडीलांचे पाद्य पूजन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/FB_IMG_1688398886808-780x470.jpg)
💐गुरुपौर्णिमा💐
—————————
शिष्याला ज्ञान देताना गुरूंची भावना
अहंकाराची नसावी – पद्माकर कुलकर्णी
————————————————
मेहता प्राथमिक शाळेत गुरुपौर्णिमे निमित्त घरोघरी -*विद्यार्थ्यांनी केले आई-वडीलांचे पाद्य पूजन*
—————————————————
●सोमवार दिनांक – ३ जुलै रोजी कै. वि. मो. मेहता प्राथमिक शाळा, जुळे सोलापूर गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी मा. श्री.पद्माकर कुलकर्णी (अध्यक्ष,मसाप जुळे सोलापूर), मा. श्री. राजेशजी पटवर्धन ( शाळा समिती अध्यक्ष ) यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी सौ. श्रुती कुलकर्णी यांनी मंत्रमुग्ध करणारी गुरुवंदना गायिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा कुगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले.”निस्वार्थ भावनेने ज्ञान देणार्या गुरुंविषयी ऋण व्यक्त करता येणारा हा दिवस आहे.” असे त्या म्हणाल्या. गुरुपौर्णिमे निमित्त विद्यार्थ्यांनी घरोघरी *आई-वडीलांचे* पाद्यपूजन केले.
●प्रमुख अतिथींचा परिचय सौ. सुनेत्रा मोहोळकर यांनी करुन दिला.याप्रसंगी व्यासपीठा वरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गुरुपौर्णिमे निमित्त इ.२री तील विद्यार्थ्यांनी *समर्थ रामदास व कल्याण* ही गुरुशिष्यांची कथा नाटीकेद्वारे सादर केली. त्यांना सौ.सुनेत्रा मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले. इ.३री आणि ४थी च्या काही विद्यार्थ्यांनी गुरुंची महती सांगणारे प्रसंग आपल्या भाषणातून सांगितले. सौ. सीमा कोरवलीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
●प्रमुख अतिथी मा.श्री.पद्माकर कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून गुरुंचे महात्म्य विशद करताना ते म्हणाले गुरू म्हणजे ‘मार्गदर्शक’ आणि ‘पौर्णिमा’ म्हणजे प्रकाश. गुरू कडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय होते. गुरूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी गुरू हा असतोच. सर्वांच्या आयुष्यातील प्रथम गुरू म्हणजे ‘आई’. कारण सर्वात पहिली संगत आपल्याला आईची लाभते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपले प्रथम गुरू म्हणजेच आईकडून घेतो. एवढंच नाहीतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई आपली मार्गदर्शक असते.आई प्रमाणेच वडील आणि पुढे शाळेत अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपले गुरू असू शकतात. गुरूंची महती थोर असते. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला ‘आचार्य देवो भवः’ ही शिकवण दिली जाते. गुरू अथवा शिक्षक हा देवासमान असतो या शिकवणीमुळेच भारतात “गुरूपौर्णिमा” आजही मनापासून आणि श्रद्धा- पूर्वक साजरी केली जाते. असे सांगून ते पुढे म्हणाले की…..
●गुरूंचे कार्य हे एक महान कार्य आहे. आपल्या शिष्यांच्या भल्याचा विचार करून त्यांना आपल्या जवळील ज्ञान आणि अनुभव निरपेक्षपणे आणि प्रामाणिकपणे देणे हेच खरे कार्य असते. ज्ञान देताना गुरूची भावना ही अहंकाराची नसावी. या ज्ञानाने आपल्या शिष्याच्या जीवनाचे कल्याण होणार आहे अशी भावना गुरुंकडे असावी. कारण जेव्हा गुरूने दिलेल्या ज्ञानाने शिष्याची प्रगती होते तेव्हा ती प्रगती पाहून जर गुरूला आनंद आणि समाधान झाले तरच तो खरा गुरू जीवनात यशस्वी होतो. शिष्याला जितकी गुरूची गरज असते तितकीच गुरूला देखील शिष्याची गरज असते. जर शिष्यच नसेल तर गुरू आपले ज्ञान कोणाला देणार. म्हणूनच गुरूने देखील आपल्या शिष्याबद्दल कृतज्ञ असावे. असे सांगून त्यांनी गुरु शिष्यांना कशाप्रकारे घडवितात हे छोट्या छोट्या गोष्टीतून सांगितले.
●याप्रसंगी शाळा समितीचे अध्यक्ष मा.श्री. राजेश पटवर्धन यांनी सर्व शिक्षकवृंदांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.शीतल जालिमिंचे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.मयुरी दुरुगकर यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व सेवक यांचे सहकार्य लाभले.
———————————————–
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)