गावगाथा

सोलापूरच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि सोलापूरच्या नव्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे; या.शरद पवार साहेब

सोलापुरात पहिल्या आयटी पार्कचे रविवारी शरद पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

शहराध्यक्ष भरत जाधव, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आयटी क्षेत्रामध्ये ज्यांनी मोठे काम केले उद्योजक सतीश मगर, अतुल चोरडिया हा सर्व सोहळा आयोजित करण्यासाठी आणि सोलापूर शहराच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये काही बदल करावा यासंबंधीची अतिइच्छा असलेले माजी महापौर महेश कोठे त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावरील मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनींना आजचा दिवस हा सोलापूरच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि सोलापूरच्या नव्या पिढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

आज या ठिकाणी आयटी पार्क काढण्याच्या संबंधीची संकल्पना श्री महेश कोठेंनी आणली आणि जो वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छितो, त्याला या ठिकाणी नियोजित करून त्यांनी आज या ठिकाणी हे एवढे मोठे काम सुरू करण्याचा संकल्प केला. जगताप यांनी हा ग्रुप सुरू केला. मी त्यांना आज एकच विचारत होतो तुम्ही आज या ठिकाणी काम सुरू करणार आहात तर ते केव्हा सुरू करणार आहात एवढेच सांगा आणि त्यांनी सांगितलं की एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. आणि वर्ष सहा महिन्याच्या आत हा प्रकल्प या ठिकाणी सुरू होईल. आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळेल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. त्यांचे मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी आज या ठिकाणी सोलापूरच्या दृष्टिकोनाने घेतली.

महाराष्ट्रात काही शहरे हे औद्योगिक शहर म्हणून ओळखली जायची. एक काळ असा होता की, पुणे हे विद्येचे माहेरघर आणि सोलापूर हे औद्योगिक क्षेत्राचे माहेरघर. चित्र बदललं पण आज पुणे हे विद्येचे माहेरघर आहे तर आहे पण त्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रामध्ये देखील पुण्याने प्रचंड बदल केले आणि त्याहीपेक्षा पुण्याने औद्योगिक क्षेत्रामध्ये देशात जी महत्त्वाची शहरे मानली जातात ज्यात आयटीच्या माध्यमातून देशाचा आणि देशाबाहेरील कंपन्यांचा संबंध येतो त्यात पुण्याने उज्वल स्थान प्रस्थापित केलेले आहे. हे सोलापूर गाव एकेकाळी वस्त्रोद्योगाच्या क्षेत्रामध्ये मोठे गाव होते मला आठवतंय मी सोलापूरचा पालकमंत्री एकेकाळी होतो. वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सोलापूर हे अग्रगण्य स्थानावर होते. आणि आज जर चौकशी केल्याच्या नंतर दुर्दैवाने आज या वस्त्रोद्योगाची एकही मिल शिल्लक नाही चालू नाही ही स्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते. त्या काळात किर्लोस्करांचे एक युनिट मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यरत होते. आणि मला आठवतं किर्लोस्करांच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्या युनिटची काळजी घेण्यासाठी नेमलेली असायची आणि त्यामुळे तो कारभार व्यवस्थित रित्या पार पडत असत. दादाजींनी त्याकाळी या ठिकाणी एक साखर कारखाना उभा केला. निधी व्यवसायाच्या उद्योगात प्रचंड प्रमाणात महिला या ठिकाणी काम करत होत्या आज त्यांचा छोटा मोठा धंदा या ठिकाणी आहे. सोलापूरच्या औद्योगिक क्षेत्राचे पुढारीकरण करायचे असेल तर आयटी क्षेत्राचे काम या ठिकाणी सुरू झालेच पाहिजे आणि त्यासाठी काहीही करायला तयार आहोतच. सर्व अधिकाऱ्यांना माझी एवढीच विनवणी आहे की, पुणे नाशिक प्रमाणेच सोलापूर या ठिकाणी सुद्धा आयटी क्षेत्रामध्ये सोलापूर शहर अग्रगण्य स्तरावर यायला हवे एवढीच काळजी तुम्ही घ्या. आज मला आनंद आहे की महेश कोठेंनी सतीश मगर, अतुल चोरडिया यांना आमंत्रित केले. सतीश मगर हे शेतीसंबंधीतील ज्ञान परदेशातून शिकून आले, पुण्यातील मगरपट्टा हे उसाच्या शेतीसाठी अग्रगण्य मानले जायचे परंतु पुणे शहर जसे वाढत गेले तसे शेती करायला जागा नसल्या कारणाने त्यांनी आयटी कंपनी चालू केली. त्या काळात आयटी क्षेत्रामध्ये त्यांनी एक लाखांहून अधिक तरुणांना रोजगार मिळवून दिला.

अतुल चोरडिया यांनी त्याकाळात पंचशिल पार्क नावाचा आयटी पार्क त्यांनी सुरु केला. त्या ठिकाणी तेव्हा काहीही नव्हते पण,आज चार लाख मुलं- मुली काम करतात. सर्व चित्र बदललंय त्याठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्ही न्यु यॉर्क मध्ये आहात की अमेरिकेतल्या कोणत्या दुसऱ्या शहरामध्ये आहात अशी खात्री आपली पडते. त्याचं कारण की आधुनिक अश्या प्रकारची उभारणी केली, लोकांना काम दिलं, उत्तम टेक्नॉलॉजी आणली आणि त्यामुळे आज पुण्याचं अर्थकारण बदलायला या दोन संस्थांनी अतिशय मोलाची कामगिरी केली. त्यानंतरसुद्धा अनेक संस्था वाढल्या आणि काही लाख लोकं या आय. टी. सेक्टरमध्ये काम करताहेत.

एक नवीन सेक्टर आता देशात येतंय आणि त्याला म्हणतात डेटा सेंटर त्या डेटा सेंटरमध्ये जगातली किंवा देशातली सगळ्या कंपन्यांची माहिती ही एका ठिकाणी ठेवली जाते. सगळे हिशोब, अकाऊंट, नोकरी, कोण काम करतंय त्याचा रेकॉर्ड हे सगळं एका डेटा सेंटरमध्ये ठेवलं जातं. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठल्याही संस्था असल्या त्याप्रकारचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये ठेवलं जातं. आज मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये सिसोदिया एक डेटा सेंटर बनवण्याच्या तयारीत आहेत. माझी खात्री आहे की, ते डेटा सेंटर झाल्या नंतर महाराष्ट्राच्या औद्योगिकरणामध्ये एक प्रकारचं वजन आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे जे वजनचा औद्योगिकरण आहे त्या वजनचे औद्योगिकरण आणि सोलापूर याचं एक नातं जोडलं जातंय याचा मला मनापासून आनंद आहे. आपण मला काही लोकांनी सोलापूरमध्ये उद्घाटनाला बोलावलं. फळबागा बनवल्या, डाळिंबाची शेती बनवली जो एकेकाळी दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेला सांगोला उत्तम प्रकारची फळं तयार करायला लागला. सोलापूरच्या अनेक ग्रामीण भागात काम केलं. आणि त्याचा परिणाम की आज सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही जिल्ह्यापेक्षा अधिक साखर कारखाने आज कुठे असतील तर ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि ते काम ऊस उत्पादन करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांनी आणि कारखानदारी उभी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व जाणकारांनी आज सोलापूरमध्ये केलं. आणि त्याचा परिणाम ग्रामीण भाग बदलतोय, सोलापूर शहर बदलतोय आणि या सर्व गोष्टी करण्याच्या संदर्भातील संकल्प आपण सर्वांनी केलेला आहे. मी याठिकाणी जगतापांचं मनापासून स्वागत करतो की त्यांनी त्यांचा आर्यन ग्रुप इथे आणायचा निकाली घेतला. त्यांनी कोकणामध्येही काही कामं सुरु केली आहेत सावंतवाडीला आणखी काही ठिकाणी कामं करताहेत. मी जगतापांना एकंच सांगेन की, सोलापूरमध्ये आलात. आता इथून पुढे जायचं नाही. आता इथे काम वाढवायचं. इथं अधिक हातांना काम द्यायचं. आणि तुम्हाला नक्की समाधान मिळेल की सोलापूरच्या आमच्या कष्टकरी माणसांनी एखादी जवाबदारी हातात घेतल्यानंतर त्याठिकाणी काही अगर मगर न करता कष्ट करण्यासाठी सोलापूरकर कधी मागे पडत नाही. त्यांच्या पाठीशी तुम्ही रहा. माझी खात्री आहे की, तुमचा आर्यन ग्रुप इथे भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. हे सोलापूर आहे आणि या सोलापूरला तुमच्या सर्वांची साथ असली पाहिजे. तुम्ही याठिकाणी रोबोट आणणार आहात असं सांगितलं मी याबाबत फारसा खुष नसतो. रोबोट याचा अर्थ काय? मशीन काम करतं. आता इथे इतकी लोकं काम करणार आहेत त्यांना बाजूला ठेऊन मशीनला तुम्ही आणता. मशीन बघूया ज्यावेळी काम करण्याच्यासाठी लोकं कमी पडतील त्यावेळी बघा ना. आता इथे कामाची सुरुवात आहेत त्याच्या आधीच रोबोट तुम्ही आणणार. मशीनला काम दिलं तर आमच्या तरुणांनी इथं काय करायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर येईल. रोबोटचा विचार जरूर करा. पण आधी याठिकाणी कारखानदारी उभी राहिलेली आहे, यशस्वी झालेली आहे. अधिक हातांना काम देणारी आहे, ही स्थिती निर्माण करा. माझी खात्री आहे सोलापूर शहर तुमच्या पाठीशी उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.

मी काय अधिक बोलून आपल्या सर्वांचं वेळ घेत नाही. याठिकाणी आताच क्रिकेटच्या संबंधीत एक पुस्तक याठिकाणी A to Z क्रिकेट म्हणून प्रकाशित झालं. एकेकाळी सोलापूरलासुद्धा क्रिकेट चांगलं होतं. मला आठवतंय एका मॅचला मी आलो होतो. Inter University हिंदुस्थानातील सगळे विद्यार्थी इथं आणि त्यांच्याविरुद्ध West Indies ची टीम या सोलापूरला आली होती. आणि त्या इंडियाच्या टीमचे कॅप्टन शेर मोहम्मद नावाचे एक अतिशय उत्तम खेळाडू होते. आणि जगात चांगले जे खेळाडू क्रिकेटचे होते त्या सर्वांनी या सोलापूरमध्ये मॅच खेळून आपल्या खेळाचं कर्तृत्व दाखवलं होतं. आणि त्या मॅचला एक क्रिकेट शौकीन म्हणून मी स्वतः हजर होतो. मला या क्षेत्रामध्ये अतिशय आस्था होती, आता मी काय फार लक्ष देत नाही. पण मी १० वर्षे मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष होतो. ०५ वर्षे देशाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. ०२ वर्षे आशिया खंडाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. आणि ०४ वर्षे जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. यामुळे या सर्व क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी काम करण्याची संधी मला महाराष्ट्राने देशाने आणि जगाने दिली. याचा मला आनंद आहे. म्हणून त्या क्षेत्रामध्ये नव्या पिढीला क्रिकेटचा ज्ञान होण्याच्यासाठी आणि क्रिकेट क्षेत्रातील जाणकार यांचा परिचय व्हावा म्हणून हे पुस्तक आज याठिकाणी आणलं. तुम्हा सर्वांच्या साथीनं त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो. आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो. नमस्कार..!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button