नळदुर्ग व उमरगा पोलिस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक जस्ट डायल करुन गुन्हेगारांनी बोलाविली कार; फरारीचा प्रयत्न फसला
जस्ट डायल करुन गुन्हेगारांनी बोलाविली कार; फरारीचा प्रयत्न फसला
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230831-WA0075-780x470.jpg)
नळदुर्ग व उमरगा पोलिस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक
जस्ट डायल करुन गुन्हेगारांनी बोलाविली कार; फरारीचा प्रयत्न फसला
अक्कलकोट, दि.31 : नळदुर्ग व उमरगा पोलिस ठाणेच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना उत्तर पोलिस ठाण्याकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, 28 ऑगस्ट 2023 रोजी तक्रारदार विजय गोपीनाथ गोडसे (वय 52 वर्षे, व्यवसाय : चालक, रा.टेल्को कॉलनी जांबुळवाडी रोड, पुणे) हा त्यांच्या स्वत:चे मालकीचे मारुती सुझूकी इर्टिगा कंपनीची कार गाडी क्र.एम.एच-12/व्हीक्यू/3385 ही गाडी भाडे तत्वावर चालवून त्यावर उपजिविका करीत होता. सदर दिवशी त्यास जस्ट डायलवरुन पुणे ते अक्कलकोट असे भाडे मिळाल्याने त्याने पुणे येथून निसार जमादार यास घेवून अक्कलकोटच्या दिशेने येत असताना निसार जमादार याने सुरुवातीला उमरगा येथे जायचे आहे. तेथील तीन मित्रांना घ्यावयाचे असल्याचे सांगितल्याने विजय गोडसे याने सदर गाडी घेवून उमरगा येथे गेला. जमादार याचे तीन साथीदार गाडीत बसले. त्यानंतर चालक गोडसे यास निसार याने अक्कलकोट येथे जायचे आहे असे सांगितल्याने विजय गोडसे हा अक्कलकोट येथे त्यांना घेवून आला असता या ठिकाणी चहा-पाणी करुन त्या दिवशी रात्रो 8 वाजणेच्या दरम्यान किणी मार्गे बणजगोळ येथे आले असता निसार जमादार याने लघुशंका आली आहे असे सांगून गोडसे यांना गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबवून ते सर्वजण लघुशंका करीत असताना गोडसे हा गाडीच्या थोडे पुढे लघुशंका करीत होता. त्याचवेळी निसार जमादार, राज नागणसुरे, संदीप आवटे, समीर भालके यानी त्यास धकलून देवून, मारहाण करुन त्याच्या ताब्यातील इर्टिगा ही घेवून पळून गेले. सदर बाबत गोडसे याने उत्तर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन वरील जणांच्या नावे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक नाईकवाडे, पो.हे.कॉ.शरद चव्हाण, पो.अंमलदार राम चौधरी, धोंडीबा ढेंगळे, पिंजारी या पथकाने तपासकामी रवाना होवून गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातून माहिती घेवून अधिक तपासात सदर आरोपी हे उमरगा व नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. सदरील आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातील असलेली रु.7 लाख किंमतीची इर्टिगा कार ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, उत्तरचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास अंमलदार सहा.पो.नि.बी.बी.नाईकवाडे, पोलिस हे.कॉ. शरद चव्हाण, अंगद गीते, पो.कॉ.कोंडीबा ढेंगळे, राम चौधरी, पिंजारी, पो.हे.कॉ.बिपीन सुरवसे यांनी सदरची कामगिरी केली आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)