सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांना आदर्श भारतीय राजदूत २०२३ पुरस्कार प्रदान….
सामाजिक कार्याबद्दल सन्मान

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांना आदर्श भारतीय राजदूत २०२३ पुरस्कार प्रदान….

सुभाष हांडे देशमुख
नवी मुंबई प्रतिनिधी


जोगेश्वरी पूर्व (मुंबई) येथील आमचे मित्र, सामाजिक कार्यकर्ते, आदर्श शिक्षक, वृत्तपत्र, लेखक, पत्रकार आदरणीय गणेश हिरवे सर म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले समाजसेवक. यांना आज रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्र न्यूज १८ चॅनेलच्या वर्धापनदिना निमित्त आदर्श भारतीय राजदूत २०२३ हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. याबद्दल गणेश हिरवे सर यांचे हार्दिक अभिनंदन तर महाराष्ट्र न्यूज १८ चे मनःपूर्वक आभार.
हिरवे सर आणि माझा परिचय होऊन आज दहा वर्ष उलटून गेली असतील. मी नेरूळ येथे राहातो तर सर मुंबईत (जोगेश्वरीत). त्यामुळे प्रत्यक्ष भेट तशी खूप कमी होत असते. मुंबईत जर समारंभ असेल तरच भेट होते, मात्र म्हणतात ना खऱ्या मित्राशी रोजच भेट व्हावी असे काही नाही, त्यांच्याशी रोजच बोलावे असेही नाही. दोन व्यक्तींचे स्वभाव आवडीनिवडी जुळल्या की मैत्रीचे रोपटे आपोआप बहरते. आमचेही तसेच आहे. आम्ही जरी नेहमी भेटत नसलो तरी आमची मैत्री टिकून आहे. याला कारणीभूत आहे सरांचा स्वभाव. नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर शाखेचे उपक्रमातून आमची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले.


जसजशी मैत्री वाढत गेली तसतसा सरांबद्दल माझ्या मनात असलेला आदर वाढत गेला. हिरवे सर गेली पंचवीस वर्ष जोगेश्वरी आणि मुंबईत सामाजिक कार्यात भाग घेत आहेत. लॉक डाऊन काळात त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजातील गोरगरीब, वंचित, आदिवासी विद्यार्थी, अनाथालय, वृद्धाश्रम, रोजंदारीवर काम करणारे मजूर, घनकचरा व्यवस्थापन कामगार अशा हजारो कुटुंबांना किराणा किट, आरोग्य किट, शैक्षणिक साहित्य वैयक्तिक तसेच आपल्या जॉय ऑफ गिविंग या संस्थेच्या माध्यमातून वितरित केलेले असून आजही अनलॉक सुरू झाला तरी त्यांचे कार्य थांबलेले नाही. गणेश हिरवे यांनी आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे केलेली आहेत. कोरोना काळात त्यांनी स्वतः पाच वेळा रक्तदान केले आहे. सरांना वाचनाचे प्रचंड वेड आहे. तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. समाजात वाचन संस्कृती रुजवी यासाठी त्यांनी स्वखर्चाने आतापर्यंत तेरा हजारांहून अधिक पुस्तके नागरिकांना व ग्रंथालयांना भेट म्हणून दिली आहेत. हिरवे सर माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही परिचित आहे. माहिती अधिकाराचा वापर करून त्यांनी अनेक नागरी समस्या सरकार दरबारी सोडवून घेतल्या आहेत. एक गुणी व मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून हिरवेसर यांना महाराष्ट्रात ओळखतात. सरांच्या सामाजिक कार्याची दखल राज्यातील अनेक संस्थांनी घेतली असून आजवर त्यांना १२३ पुरस्कार व ७७ करोना योद्धा सन्मानपत्र प्राप्त झाली आहेत. सामाजिक कार्य करतानाच आपल्या मूळच्या शिक्षकी पेशाकडे मात्र ते जराही दुर्लक्ष होऊ देत नाही. एक आदर्श, विद्यार्थिप्रिय, उपक्रमशील शिक्षक म्हणून ते जोगेश्वरीमध्ये व मुंबईत नावाजलेले आहेत. त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या या माझ्या मित्राला आरोग्यदायी निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.