गणेशोत्सव व्याख्यानमाला – ‘ऑपरेशन सिंदुर पराक्रम अभूतपूर्व’ : प्रेरणादायी व्याख्यानाने भारावले श्रोते

अक्कलकोट, दि. ३ सप्टेंबर
गणेशोत्सव व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफताना ‘ऑपरेशन सिंदुर – पराक्रम अभूतपूर्व!!’ या विषयावर सेवानिवृत्त पीव्हीएसएम, व्हीएसएम प्रदीप पद्माकर बापट व सेवानिवृत्त विंग कमांडर अविनाश मुगळ यांनी भारतीय संरक्षण सिद्धतेचे महत्त्व अधोरेखित केले.
“भारत आत्मनिर्भर झाला आहे. १४० कोटी भारतीयांच्या जिद्दीमुळे ‘ऑपरेशन सिंदुर’ यशस्वी झाले. इस्त्रोच्या अभूतपूर्व तंत्रज्ञानामुळे आणि जवानांच्या कठोर प्रशिक्षणामुळेच शत्रूचा प्रत्येक हल्ला विफल करण्यात यश आले. आज आपण सुरक्षित आहोत आणि भावी पिढ्याही सुरक्षित राहतील, कारण भारताची संरक्षण क्षमता जगात अद्वितीय आहे,” असे प्रतिपादन बापट यांनी केले.
या व्याख्यानात त्यांनी भारताने पाकच्या १०० किमी आत अचूक हल्ला करून शत्रूला चीत केले, क्षेपणास्त्रांचा वेग शत्रूच्या क्षेपणास्त्रांपेक्षा अधिक ठरला, अशा अनेक प्रेरणादायी किस्स्यांनी उपस्थित श्रोत्यांत देशभक्तीची ऊर्जा चेतवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन सेवानिवृत्त अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर व पत्रकार अरविंद पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बापट व मुगळ यांचा विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे प्रतिमा व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
समारोपावेळी “भारत माता की जय, वंदे मातरम्” अशा घोषणांनी सभागृह दुमदुमले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूजी निंबाळकर यांनी केले, परिचय कल्पना स्वामी यांनी करून दिला, तर आभार निशिगंधा सोमेश्वर यांनी मानले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!