
*मामाच्या मळ्यात* – ( बालकविता )
*कवी* – श्री. सचिन बेंडभर
*प्रकाशक* – दिलीपराज प्रकाशन,
पुणे.
*पृष्ठे* – ५२
*मूल्य* – १३० रु.
*मुखपृष्ठ* – श्री. सागर नेने
*समीक्षक -* डॉ. कैलास दौंड

________________________________

*’मामाच्या मळ्यात ‘उत्तम ग्रामानुभवाची बालकविता!’*

सचिन बेंडभर पाटील यांचे नाव मराठी साहित्य जगताला परिचित आहे. त्यांनी कादंबरी, कथा व कविता लेखन भरपूर केलेले आहे. दरवर्षी अनेक दिवाळी अंकातूनही त्यांचे साहित्य वाचायला मिळते. बाल साहित्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेले लेखन विशेष दखलपात्र आहे. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केलेले आहेत. बालसाहित्यामध्ये आजोबांची शिकवण, खरं सोनं, मायावी तळ्याचे रहस्य, सूर्य नारायणाचे वरदान, गोप्याची चतुराई, धाडसी शिवशंकर , बळी तो कान पिळी, भानाचं भूत, गुरुदक्षिणा, वाघाची डरकाळी, छोटा भीम आणि मायावी राक्षस, ज्ञानसागर, जादूची अंगठी, जो जो, तिसरा वाटा, माझा मित्र अशा अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे आणि ती पुस्तके बालवाचकांची आवडती झाली आहेत.
अलीकडेच त्यांचा मामाच्या मळ्यात हा बालकवितासंग्रह दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी देखण्या स्वरूपात प्रकाशित केला आहे. या संग्रहामध्ये बालकविता आहेत. खेडेगाव आणि तिथला निसर्ग याचे आकर्षण सर्वांनाच असते. त्यामुळे तिथे राहणाऱ्या मामाच्या गावी जावे असेही बालमनाला वाटत असते.
कसा आहे मामाचा मळा ? तर मामाच्या मळ्यात सुकामेवा आहे आणि तो हवा तेवढा खायला परवानगी सुद्धा आहे.
‘पिकली चिंच आंबट गोड
तरीही खायची पेरूची फोड
करवंदाची पिकली जाळी
हळूच तोडा काळी काळी’
प्रारंभीच्या बालकवितेतील अशा ओळी ‘मामाच्या मळ्यात’ जायला भाग पाडतात. ‘विजयाचा तो स्वामी’ही एक भन्नाट कविता आहे. प्रतिस्पर्ध्याला कमी न लेखता कामांमध्ये दक्ष असावे असा संदेश या कवितेतून अगदी सहजपणे मिळतो. तर ‘पाऊस’ नावाच्या कवितेत पावसाचे हवे हवेसे रूप भेटते .
‘ओली ओली झाडे, पक्षीही ओले
पावसाच्या सरीत ,डोंगरही न्हाले’
अशा पाऊस क्षणात रानात मोर नाचला नाही तरच नवल! अशा पावसाला पाहून ‘पावसाचं गाणं म्हणायचं’ असा बालसुलभ विचारही कवितेतून येतो तर ‘आजोबा’ ही आजच्या बालकांच्या व्यथा अधोरेखित करणारी आणि पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी बालकविता आहे. ‘प्रयत्नाने मिळते यश’ असे सांगणारा आजोबाही या बालकवितेत भेटतो. आजोबा मुलांचा ‘तळ्यात मळ्यात ‘हा खेळ घेतात. आजच्या काळामध्ये कुटुंबामध्ये आजी-आजोबांचा असणं हे नातवंडासाठी किती महत्त्वाचा आहे हे अशा काही कवितांमधून वारंवार अधोरेखित होते.
बालमन हे निरागस , निर्मळ तर असतेच त्याचबरोबर ते काळजीवाहूही असते. आपलेच प्रतिबिंब पाहून आरशाला चोंच मारणाऱ्या चिमणीला बालमन समजावते. ‘दुनिया करा रे एक सारी’ ही जातीपातीचा भेदभाव सोडायला सांगणारी रूपकात्मक कविता मुलांना तर आवडेलच परंतु प्रौढांनाही विचार करायला भाग पडेल अशी आहे. ‘सोन्या माझा गुणाचा’ या कवितेमध्ये आजी नातवांना शिकवते.
चिंटू या कवितेतून लहान मुलांचे खेळणे येते. लहान मुलांना आजीचा अनुभवी आधार असतो. आजी मुलांना चांगली शिकवण देते. चांगल्या सवयी लावते.घरातील आजोबा कधीच घाईत नसतात ते नातवंडांच्या प्रश्नांची उत्तरे देतात.
बालकांसाठी सुंदर अनुभवाच्या,आजी आजोबांच्या जिव्हाळ्याच्या कविता घेऊन आलेल्या मामाच्या मळ्यातील कविता बालवाचकांना समृद्ध व्हायला मदत करतील हे खरेच.
