गावगाथा

*वचन साहित्यासाठी हरळय्या, कक्कय्या व शरणांनी कुर्बानी दिली याची जाण ठेवा – इंजि. डी. एन. सुर्यवंशी*

सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन 2024

*वचन साहित्यासाठी हरळय्या, कक्कय्या व शरणांनी कुर्बानी दिली याची जाण ठेवा – इंजि. डी. एन. सुर्यवंशी*

 

नांदेड (प्रतिनिधी) : महात्मा बसवण्णा यांच्या वचन साहित्याच्या रक्षणासाठी संत हरळय्या, वीर कक्कय्या व हजारो शरण शरणींनी आपल्या जीवांची कुर्बानी दिली, याची जाण आपण ठेवली पाहिजे असे विचार इतिहास संशोधक विचारवंत इंजि. डी. एन. सुर्यवंशी (पुणे) यांनी मांडले.
नांदेड येथे नुकतेच संपन्न झालेल्या सातव्या अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलनातील परिसंवादात अध्यक्षीय समारोपप्रसंगी इंजि. डी. एन. सुर्यवंशी बोलत होते. “वचन साहित्य, संत साहित्य, गुरुवाणी ते भारतीय संविधान !” या विषयावरील हा परिसंवाद भरपूर गाजला. त्यात इंजि. सुर्यवंशी यांनी प्राण ओतला.
आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात इंजि. डी. एन. सुर्यवंशी पुढे म्हणाले की, म. बसवण्णा आणि त्यांच्या अनुभव मंटपातील वचन साहित्य, सर्व संतांचे संत साहित्य, गुरु ग्रंथ साहिब मधील विविध संत महात्म्यांची गुरुवाणी ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकांनी कठोर परिश्रमातून साकार केलेली भारतीय संविधानाची निर्मीती, त्यासाठीचा खडतर प्रवास, ही एक संघर्ष कहानी आहे. यासाठी आपल्या महामानवांना भरपूर परिश्रम करावे लागले. सहज सुचलं, लिहून टाकलं हे असले साहित्य नाही. या सर्व साहित्याचा समता हा एक मुलभूत आधार होता, म्हणून या साहित्याचे संवर्धन हे आपले कर्तव्य ठरते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे संत साहित्याचे अभ्यासक होते, म्हणून त्यांनी गुरु रविदासांना आपला ग्रंथ अर्पण केला आणि संत कबिरांना आपले गुरु मानले, म्हणून या संतांच्या वचनांचा प्रभाव संविधानावर पडलेला दिसून येतो. कलम १७ म्हणजे गुरु रविदासांचे समतेचे तत्व आहे. “हम भी चाम के, तुम भी चाम के, चाम का है जग सारा, चाम बिन कौन बना, कहे रविदास चमारा !” हा विचार संविधानात समतेचा विचार म्हणून समाविष्ट झाला आहे असे सांगून इंजि. डी. एन. सुर्यवंशी यांनी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचे कौतूक केले. भारतात कुठेही गुरु रविदासांच्या नावाने साहित्य संमेलन होत नाही पण देगलूरकर यांनी सात संमेलने यशस्वी करुन दाखविली म्हणून ते कौतुकास पात्र आहेत असे म्हणाले.
या परिसंवादात कवी मधू बावलकर (आदिलाबाद), प्रशांत सोनुने (बुलडाणा), माधव लांडगे (निलंगा), नामदेव फुलपगार (नांदेड) यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक गंगाधर गंगासागरे यांनी केले तर सूत्रसंचलन संदिप कांबळे (पालम) यांनी केले. शेवटी आभार भीमराव वाघमारे यांनी मानले. संमेलनाध्यक्ष सुधाकर जोगळेकर, स्वागताध्यक्ष बालाजीराव सोनटक्के, उदघाटक इंजि. डी. टी. शिपणे, साहित्यिक मधू बावलकर, पुरुषोत्तम बोर्डे, नरसिंग सुर्यवंशी, गुणवंत मिसलवाड यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. अभिषेक साळे, संतोष बोराळकर, हणमंत उतकर, संजय वाघमारे, हणमंत गंगासागरे, विपुल देगलूरकर, माधव गंगासागरे, गजानन सुरोशे, परमेश्वर गंगासागरे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button