Sant Tukaram Maharaj : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरी ; टाळ मृदुंगाच्या गजरात देहूनगरी दुमदुमली

देहू (प्रतिनिधी ): जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा 339 वा पालखी सोहळा यावर्षी होत आहे. टाळ-मृदंगाचा गजर, विणेचा झंकार,आणि जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष अशा भक्तिरसाने परिपूर्ण भरलेल्या वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी (दि. 28) दुपारी दोन वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले. पालखीचा पहिला मुक्काम देहू गावातील इनामदार साहेब वाड्यात असणार आहे.


शुक्रवारी पहाटे मुख्य मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर वैकुंठगमन स्थान मंदिरात महापूजा झाली. तपोनिधी नारायण महाराज समाधीपूजा झाली. तुकोबांच्या पादुकांना चकाकी देऊन त्या इनामदार वाड्यात आणण्यात आल्या. तिथून त्या मुख्य मंदिरासमोरील भजनी मंडपात आणण्यात आल्या. सकाळी दहा ते बारा या कालावधीत पालखी सोहळा सप्ताहाचा काला झाल्यानंतर मुख्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

संत तुकाराम महाराजांच्या या 339 व्या पालखी प्रस्थान सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी लाखो वैष्णवांनी इंद्रायणीकाठी दाटी केली होती. या सोहळयासाठी राज्यभरातून लाखो भाविक देहूत दाखल झाले होते. मानाचा वारकरी आणि पाहुण्यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या.

दरम्यान, या वारीसाठी वारकऱ्यांना कोणत्याही समस्या येऊ नये यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आलेली आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी, औषधे, फिरते शौचालय अशा सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. शिवाय तब्बल शहरात तब्बल ५००० पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत.