Akkalkot: एकरुख सिंचनवरून तालुक्यात आजी- माजींमध्ये श्रेयवाद ; याचा श्रेय केवळ स्व.आमदार बाबासाहेब तानवडे, लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांनाच – माजी विरोधी पक्षनेते, बाळासाहेब मोरेंची घाणाघात
पक्षांतर्गत ही मतभेद

अक्कलकोट (प्रतिनिधी)-अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनतेसाठी वरदायिनी ठरलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेच्या अंतिम टप्प्याच्या कामाच्या श्रेयवादासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू आहे.पण खरा इतिहास वेगळा आहे.आमदार कल्याणशेट्टी यांनी या योजनेसाठी साधी वीटदेखील उचलली नसताना त्यांना आयते बटण दाबायचे भाग्य मिळाले. तर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना जनतेने वारंवार संधी दिली. मंत्रीपद मिळाले पण योजना का रेंगाळली..? त्यांनी जाणुनबुजून जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले असा आरोप पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ते पुढे बोलताना मोरे म्हणाले की, कुरनूर धरण व एकरूख उपसा सिंचन योजनेचा खरा इतिहास वेगळा आहे.या योजनेसाठी स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे, लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांनी मोठे कष्ट घेतले.या योजनेस तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बळ देण्याचे काम केले.परंतु दुर्दैवाने आज भाजपाच्या पक्षातच तानवडे व मोरे या निष्ठावंत परिवाराला दुर्लक्षित केले जात आहे.एकरुखच्या योजनेसाठी ४१२ कोटी ८० लाख रुपयांची गरज आहे.परंतु या योजनेवर प्रत्यक्षात २०५ कोटी ३१ लाख रुपये खर्च झाले आहेत.योजनेच्या पुर्णत्वासाठी आणखी २०७ कोटी ४९ लाख रुपयांची गरज आहे.यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना श्रेयवादाची लढाई लढण्यासाठी म्हेत्रे व कल्याणशेट्टी सतत प्रयत्न करतात हे चुकीचे आहे.

सन २००-२००८ या कालावधीत म्हेत्रे यांनी एकरुप योजनेच्या पूर्णत्वासाठी बऱ्यापैकी निधी आणले. परंतु ही योजना रखडलीच.मग मध्यंतरीच्या काळात सुप्रमा अभावी या योजनेचे काम रखडले होते.परंतु तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या सहकार्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली व या योजनेची गरज सांगितली.या योजनेची गरज ओळखून मी केलेल्या पाठपुरावाचा संदर्भ घेत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी कुरनूर धरणावर येऊन पाहणी केली होती व तात्काळ ४८ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी त्यांनी दिली होती.या संदर्भातील पत्रव्यवहार व आवश्यक पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत.कल्याणशेट्टी व म्हेत्रे यांनी काय प्रयत्न केले ते जनतेसमोर दाखवण्याचे माझे आव्हान असेल असे मोरे यांनी यावेळी सांगितले.

या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद तानवडे व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे उपस्थित होते.

दरम्यान, या एकरुख उपसा सिंचन योजनेमुळे अक्कलकोट शहराचा व ५१ गावाचा पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे, अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावामधील १०११० हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील १९ गावची ७२०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
खरी भाजप ही तानवडेंमुळेच ,पण सध्याचे लोकप्रतिनिधी हे स्वीकारत नाहीत हे दुर्दैव-आनंद तानवडे(माजी सदस्य-जिल्हा परिषद
तत्कालीन आमदार बाबासाहेब तानवडे यांनी कुरनुर धरणाच्या निर्मीतीसाठी व भाजप पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे.परंतु सध्याचे लोकप्रतिनिधी यांना तानवडे परिवाराची बहुधा ॲलर्जी असावी.योगदान ज्यांनी दिले त्यांचे नाव घेण्यात कसली अडचण हेच कळेना.एकरुख योजनेच्या अंतिम टप्प्याच्या पुर्णत्वासाठी बाळासाहेब मोरे यांचे योगदान आहे.मंत्रालयात मी त्यांच्यासमवेत अनेकदा यासंदर्भात गेलो आहे.