गावगाथाठळक बातम्या

Nigdi: निगडीत एका अल्पवयीन मुलीला दोन वर्षांपासून क्रिडा शिक्षक करत होता लैंगिक छळ ; निगडी पोलिसांत गुन्हा दाखल

निगडी (प्रतिनिधी): शाळेतील क्रीडा शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा मागील दोन वर्षांपासून लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार निगडी मधील एका शाळेत समोर आला आहे. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात क्रिडा शिक्षकासह मुख्याध्यापक, संस्था चालकांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे याच क्रीडा शिक्षकावर सन 2018 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तरी देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला नोकरीवर ठेवले.

क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे.

सध्या बदलापूर प्रकरण देशभर चर्चेत आहे. त्यावरून सबंध देशभर तीव्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अलर्ट मोडवर येत हद्दीतील सर्व शाळेतील शिक्षकांना मुलींच्या सुरक्षितेबाबत सूचना केल्या. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसोबत बैठका घेऊन शासन आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या. तसेच, शाळेत कंत्राटी पद्धतीने असलेल्या कामगारांची चारित्र्य पडताळणी तत्काळ करून घेण्यास सांगितले. याव्यतिरिक्त ठाणे स्तरावर शांतता व मोहल्ला कमिटीच्या सदस्यांना बोलवून हद्दीमध्ये शांतता कायम राखण्यासाठी खबरदारी घेण्यास सूचित केले.

निगडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी हद्दीतील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थिनींना धीर दिला. त्यांना गूड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर निगडी परिसरातील एका शाळेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मार्गदर्शन केल्यानंतर एका 12 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्याबाबत घडत असलेल्या अनुचित प्रकारची पालकांकडे वाच्यता केली.

 

 

शाळेतील क्रीडा शिक्षकाने 12 वर्षीय विद्यार्थिनीचा मागील दोन वर्षांपासून लैंगिक छळ केला असल्याचे विद्यार्थिनीने सांगितले. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी संबंधित क्रीडा शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक आणि संस्था चालकासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लैंगिक छळाची वाच्यता केल्यास मारण्याची धमकी 

मुलीचा लैंगिक छळ केल्यानंतर आरोपी शिक्षकाने ‘हा प्रकार कोणाला सांगितला तर लय मारीन, अशी धमकी दिली. विद्यार्थ्यांना खेळाच्या तासाला वर्गातून बाहेर घेऊन जात असताना तो पिडीतेशी लगट करत असे. विद्यार्थिनी शौचालयात गेली असता तो बाहेर थांबून राहत असे. शाळेत येण्यास उशीर झाल्यास तो पीडित विद्यार्थिनीला मारत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 

क्रिडा शिक्षकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी 

आरोपी क्रीडा शिक्षकावर सन 2018 मध्ये निगडी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला शिक्षा देखील केली आहे. तरी देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांना प्रोत्साहन दिले असल्याची तक्रार पीडित मुलीच्या पालकांनी केली आहे.

हे प्रकरण समोर येताच आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निगडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. या प्रकरणात आणखी पीडित मुली समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून तपास केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button