प्रेरणादायक

हत्तीवरून मिरवणूक काढून लेकीच्या जन्माचे स्वागत

पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम

हत्तीवरून मिरवणूक काढून लेकीच्या जन्माचे स्वागत

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराजवळ असलेल्या पाचगावमधील पाटील दाम्पत्याने आपल्या पोटी मुलगी जन्माला आल्यानंतर या चिमुकलीचे ढोल ताशांच्या गजरात आणि तुतारीच्या निनादात लेकीची हत्तीवरून मिरवणूक काढून स्वागत केले. मिरवणुकीतून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’चा सामाजिक संदेश देण्यात आला. मुलीचे नाव ईरा असे ठेवण्यात आले आहे.

मुलगी झाल्यानंतर अनेक जण नाक मुरडत असतात. एरवी मुलगी झाल्यानंतर घरच्या दूषणे दिली जातात. सॉफ्टवेअर इंजिनिअर गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुलीचे केलेले स्वागत पाहून आई मनीषा पाटीलही भारावून गेल्या. गिरीश पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी लाडक्या कन्येचे स्वागत करण्यासाठी ढोल ताशा आणि मर्दानी खेळ खेळाचे आयोजन करण्यात आले होते.
पाचगावमधील गिरीश आणि मनीषा पाटील यांना लग्न होऊन सात वर्षे झाली; पण मुलबाळ नव्हते. त्यामुळे हे दाम्पत्य नाराज होते; लग्नाच्या सात वर्षांनंतर मनीषा पाटील यांना दिवस गेले. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. लग्नानंतर तब्बल आठ वर्षांनी बाळ झाले. त्यामुळे गिरीश पाटील यांनी मुलीची चक्क हत्तीवरून वरात काढायचे ठरवले.

पाचगावमधील शांतीनगर येथील ओम पार्क ते ढेरे मल्टीपर्पज हॉल या मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. लेकीचे स्वागत करण्यासाठी हत्तीवरून काढलेल्या मिरवणुकीत लहान मुलांना वेगवेगळ्या वेशभूषेत नटवण्यात आले होते. त्यांच्या हातात सामाजिक संदेश देणारे फलक देण्यात आले होते. मुलींच्या जन्माबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर व्हाव्यात हा या कार्यक्रमाचा उद्देश होता, असे गिरीश पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button