मराठी भाषा विद्यापीठ अभ्यास मंडळावर माधव राजगुरू
पुणे : ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ व प्रसिद्ध भाषा अभ्यासक माधव राजगुरू यांची देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली आहे. राज्य शासनाने सप्टेंबर 2024 मध्ये मराठी विद्यापीठाची स्थापना रिद्धपूर, अमरावती येथे केली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी ही निवड केली आहे.
राजगुरू हे बालभारतीचे निवृत्त विशेषअधिकारी असून मराठीचा शालेय अभ्यासक्रम तयार करण्यात आणि पहिली ते आठवीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीत 20 वर्षे त्यांनी योगदान दिले आहे. शासन पुरस्कृत जीवन शिक्षण, शिक्षण संक्रमण, किशोर या मासिकांच्या संपादनाची जबाबदारीही पार पाण्याबरोबरच त्यांनी काही काळ मुलांचा हिरो झंप्या हे स्वत:चे द्वैमासिकही चालवले आहे. सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्यवाह, तसेच बालसाहित्यातील आद्य संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांची कथा, कविता व शैक्षणिक विषयावरील 27 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील बहुतांश पुस्तके मराठी भाषा अभ्यास, शुद्धलेखन व व्याकरणावर अधारित आहेत. मराठी भाषेची परंपरा व समृद्धी यासाठी विविध माध्यमातून राजगुरू कार्य करत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी मराठी शुद्धलेखनाच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!