कुरनुर धरण पुर्ण क्षमतेने भरुन खालील आठ बंधारे भरुन द्या – सिद्धाराम म्हेत्रे
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..

कुरनुर धरण पुर्ण क्षमतेने भरुन खालील आठ बंधारे भरुन द्या – सिद्धाराम म्हेत्रे
माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..
अक्कलकोट ( प्रतिनिधी )- सध्या उजनी धरणातुन एकरुख योजनेच्या माध्यमातून कुरनूर धरणात पाणी सोडले जात आहे.या पाण्याची गती वाढवुन कूरनुर धरण १०० टक्के भरुन धरणाखालील आठ केटीव्हीआर बंधारे भरुन देण्याची मागणी माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अधीक्षक अभियंता भीमा कालवा कार्यालय,सिंचन भवन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कुरनूर धरणावर अक्कलकोट तालुक्यातील ५१ गावे व ३ नगरपालिकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.अनेक शेतकऱ्यांनी धरणातून पाइपलाइन नेली आहे.पावसाळा अंतिम टप्प्यात आले असला तरीही दमदार पावसाअभावी तालुक्यातील कोणत्याही प्रकल्पात पाणीसाठा झाला नाही.धरणाखालील आठही बंधारे भरुन दिल्यास आगामी काळात काही अंशी पाणीटंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.ही बाब म्हेत्रे यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितली.जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी दुरध्वनीद्वारे संपर्क साधला.यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी म्हेत्रे यांना दिले.कुरनुर धरणाखाली अक्कलकोट तालुक्यात सांगवी,बणजगोळ,गौडगाव खु,मिरजगी,रुद्देवाडी,संगोळगी ब,बबलाद,सातनदूधनी, हे आठ बंधारे आहेत.
यावेळी म्हेत्रे यांच्यासमवेत अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिध्दार्थ गायकवाड,मोहन देडे,सोमनाथ चिकलंडे,जटप्पा मुत्तगी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी दिले आदेश –
दरम्यान शुक्रवारी म्हेत्रे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भीमा कालवा कार्यालयाच्या अधीक्षकांना कुरनूर धरण तात्काळ भरून त्याखालील आठही बंधारे भरून घेण्यासंदर्भात आदेश दिल्याची माहिती माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.



