अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या पुरस्कारांची घोषणा
-धायगुडे, जवादे, वंसकर, मलये, जाधव, झुंजारराव पुरस्काराचे मानकरी
पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे देण्यात येणार्या राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा बुधवारी (दि. 23) करण्यात आली. सन 2024 वर्षातील बालसाहित्यातील नऊ विभागात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे दिली.
कादंबरीसाठी दिला जाणारा लोखंडे-जोशी पुरस्कार कल्पना मलये कणकवली यांच्या ‘सई’ या पुस्तकाला जाहीर झाला आहे. वा. गो. आपटे पुरस्कार रवींद्र जवादे, मूर्तिजापूर यांच्या ‘चिंटू अस्वल आणि त्याचे घर’ या कथासंग्रहाला, ग. ह. पाटील पुरस्कार रमेश वंसकर, गोवा यांच्या ‘वार्या वार्या आंबे पाड’ या कवितासंग्रहाला, दयार्णव कोपर्डेकर पुरस्कार प्रमोद धायगुडे, वाघोशी, खंडाळा यांच्या ‘आबली’ या किशोर कथासंग्रहाला, लीलाताई भागवत पुरस्कार डॉ. विठ्ठल जाधव, बीड यांच्या ‘एकविसाव्या शतकातील बालसाहित्य’ या समीक्षा ग्रंथाला, प्रथम प्रकाशनासाठी कारले गुरुजी पुरस्कार राजेंद्र झुंजारराव, पुणे यांच्या ‘चिमण्यांची शाळा’ या पुस्तकाला, तर उत्कृष्ट सजावटीचा सर्जेराव जगताप पुरस्कार विजयकुमार चित्तरवाड, छ. संभाजीनगर यांना ‘वाचू गाऊ नाचू आनंदे’ पुस्तकाच्या सजावटीसाठी जाहीर झाला आहे. दिवाळी अंक – आनंद मासिक हा पुरस्कार ‘छावा’ दिवाळी अंकाला जाहीर झाला आहे. ‘छावा’च्या संपादक डॉ. गीताली टिळक आहेत. बालसाहित्य प्रकाशनासाठी दिला जाणारा बा. रा. मोडक पुरस्कार नंदिनी प्रकाशन, पुणे यांना जाहीर झाला आहे.
बालसाहित्य पुरस्कारासाठी संस्थेकडे 100 पेक्षा अधिक पुस्तके प्राप्त झाली होती. पुस्तकाचे परीक्षण प्रा. सचिन पालवे, रवीकांत आदरकर, सचिन बेंडभर व शिवाजी चाळक यांनी केले. संस्थेतर्फे 2 ऑगस्ट रोजी पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सकाळी 10.30 वाजता लता मंगेशकर सभागृह, मॉर्डन महाविद्यालय, शिवाजीनगर पुणे -5 येथे आयोजित करण्यात आला असून 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख व संदर्भ तज्ज्ञ, ग्रंथ प्रसारक प्रसाद भडसावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
सन्मानपत्र, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती माधव राजगुरू आणि अनिल कुलकर्णी यांनी दिली. या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.
चौकट
अभिनव वाचन उपक्रमातील विद्यार्थ्यांचा गौरव
संस्थेतर्फे ऑगस्ट 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी अभिनव वाचन उपक्रम घेण्यात आला होता. त्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासेतर पुस्तके, ग्रंथांचे वाचन करून त्या त्या पुस्तकाबद्दलचे मनोगत स्वहस्ताक्षरात दर महिन्याला नियमित लिहून पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमात सर्वाधिक पुस्तके वाचणार्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. त्यात उपरी ता. पंढरपूर विद्यार्थी – श्रावणी नागणे, राधा पवार, साक्षी वाघमारे, कीर्ती शिरगुरकर, सायली लोखंडे, छ. संभाजीनगर येथील विद्यार्थी – राहेश कुलकर्णी, श्रेया नातू, गौतमी अजगावकर, अंजली केने, निधी कांकरिया, कवडा, हिंगोली येथील विद्यार्थी – पवित्रेश्वर चक्रधारी, सृष्टी नरवडे, तेजस्विनी देवरे, अनुष्का भोपळे, वरद भुजंग, नयना गवई यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच मार्गदर्शक शिक्षक शिवाजी नागणे, सोलापूर, डॉ. विनोद सिनकर, छ. संभाजीनगर, बबन शिंदे हिंगोली, प्रा. सुहास सदावर्ते, जालना यांचा वाचनगुरू म्हणून पाहुण्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार असल्याचेही संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!