पुस्तके, रोख रक्कम दानातून संस्मरणीय ठरलेला विवाहसोहळा !
सोलापूरच्या अमोल सीताफळे या बहुगुणी तरूणाच्या विवाहातील या महत्त्वाच्या घटना अनेकांना स्फूर्तिदायक

- पुस्तके, रोख रक्कम दानातून
संस्मरणीय ठरलेला विवाहसोहळा !
स्वतःचा विवाहसमारंभ सगळ्यांच्याच स्मरणात असतो. पण विवाहापासून आपण नव्या आयुष्याची सुरूवात करीत आहोत आणि हे नवे आयुष्य ज्यांनी बहाल केले त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही कौतुकास्पद घटना आहे. सोलापूरच्या अमोल सीताफळे या बहुगुणी तरूणाच्या विवाहातील या महत्त्वाच्या घटना अनेकांना स्फूर्तिदायक ठराव्यात.

– रजनीश जोशी
००००
सोलापूरचे तरूण पत्रकार आणि आता माळशिरस न्यायालयातील अधिकारी अमोल सीताफळे यांनी आपल्या विवाहात दहा हजार रूपयांची पुस्तके सोलापुरातील वाचनालयाला भेट दिली. इतकंच नाही तर लग्नात आहेराच्या स्वरूपात मिळालेली रोख रकम न मोजता जशीच्या तशी एका सामाजिक संस्थेला दान दिली. शिवाय विवाहाच्या निमंत्रण पत्रिकेत ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ आणि ‘नारी का करो सम्मान । तभी बनेगा देश महान’ ।। असा संदेशही दिला होता. मुंबईच्या नम्रता माने यांच्याशी त्यांचा विवाह नुकताच झाला.
अमोलमध्ये पत्रकार, कलावंत, सूत्रसंचालक, सामाजिक कार्यकर्ता दडलेला आहे. ही विविध रूपे यानिमित्ताने उजळून निघाली आहेत.

पत्रकार म्हणून नोकरी करत असतानाच सरकारी नोकरी मिळवण्याचा निश्चय त्यांनी केला आणि त्यासाठी सोलापुरातील पूर्वविभाग वाचनालयात अभ्यास केला. या वाचनालयात केलेल्या अभ्यासामुळे यश प्राप्त झाल्याची कृतज्ञ जाणीव त्यांच्या मनात होती आणि त्यांनी विवाहसमारंभात दहा हजार रूपयांची स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील, अशी पुस्तके वाचनालय संचालकांकडे भेट म्हणून सुपूर्त केली.

अमोलवर प्रेम व्यक्त करण्यासाठी जमलेल्यांनी त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात आहेर केला, ती रक्कम अमोल यांनी प्रार्थना फाऊंडेशन या सेवाभावी सामाजिक संस्थेला देऊन टाकली. विशेष म्हणजे, अमोल यांच्या लग्नपत्रिकेत २४ छोटे निमंत्रक, ११ स्वागतोत्सुक, १८ कार्यवाहक आणि तेवढ्याच नातेवाईकांची नावे आहेत.
अमोल हे उत्कृष्ट सूत्रसंचालक असल्याचा अनुभव विविध कार्यक्रमांतून अनेकांनी घेतला आहे, त्यांच्या विवाह समारंभात ज्यांनी उत्तम नृत्य केले त्यांना ५००० रूपयांचे खास पारितोषिकही त्यांनी दिले. कलावंताची कदर करण्याची त्यांची मानसिकता यातून दिसते.
अमोल आणि नम्रता यांचे वैवाहिक आयुष्य सफल आणि परस्परांना सौख्यदायी तर होणारच आहे, पण ते इतरांना प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

अमोलचा संपर्क क्रमांक – ९९२१९०४५०५

– रजनीश जोशी
०००००