मोफत पुस्तकं वाटणारा अवलिया : गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी
श्याम ठाणेदार
गणेश हिरवे जोगेश्वरी येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते.एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व…यांनी एक वेगळाच छंद जोपासला आहे मागील पंचवीस वर्षापासून आणि तो म्हणजे लोकांना मोफत पुस्तकं वाटण्याचा…
हिरवे सरांकडे ज्या ज्या व्यक्ती त्यांना कामानिमित्त भेटायला येतात त्यांना आणि ते ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना ते पुस्तकं व मासिक भेटी निमित्त देत असतात…त्यांच्या बॅगेत तुम्हाला दोन चार पुस्तक दिसतीलच.ती ते मुद्दामच ठेवतात… भेट देण्यासाठी…प्रवासात देखील नवीन ओळखी झाल्या की ते लगेच पुस्तक भेट देतात…आता पर्यंत त्यांनी तेरा हजाराहून अधिक पुस्तक भेट दिलीत…
दरवर्षी गणपती उत्सवा दरम्यान ते विविध मंडळांना पुस्तक पुरवितात…एवढेच काय विविध क्रीडा स्पर्धा, स्नेह संमेलन, संघटनांचे अधिवेशन, विविध सण उत्सव, कार्यक्रम यावेळी देखील आणि विविध वाचनालयाना त्यांनी पुस्तक दिलेली आहेत.
सध्याचे डिजिटल युग पाहता अनेकांची वाचनाची आवड कमी झालेली असून प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचणारे सध्या दुर्मिळ होत चाललेत.वाचन व लेखन केल्याने भाषा समृद्ध तर होतेच, पण हा एक चांगला छंद असल्याचे हिरवे सांगतात.पुस्तक आपल्या जीवनात दीपगृहाचे, मार्गदर्शनाचे काम करतात.लोकमान्य टिळकांनी देखील मंडाले कारागृहात शिक्षा भोगत असताना गीतारहस्य या ग्रंथाची निर्मिती केली असे हिरवे आवर्जून सांगतात.हिरवे केवळ पुस्तक देत नाहीत तर अनेक सामाजिक कार्यात देखील पुढाकार घेऊन ते उतरतात.आतापर्यंत त्यांनी एकूण ३५ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट केले आहेत. करोना काळात देखील त्यांनी उल्लेखनीय सामाजिक काम केले होते व याची नोंद अनेकांनी घेऊन त्यांचा गौरव केला आहे.पुस्तक भेट देऊन वाचन संस्कृती जोापासण्यामध्ये त्यांच्या योगदानामुळे आज अनेक क्षेत्रातील विविध लोक त्यांच्याशी जोडले गेले असून विविध शुभ प्रसंगी गिफ्ट बरोबरच एखाद छानस गोष्टीचं पुस्तक आपण सहज देऊ शकतो यावर ते जोर देतात.समाजाप्रती हिरवे सर करीत असलेले कार्य खरोखरच प्रेरणादायी असून त्यांच्या या पुस्तक मोफत देण्याच्या छंदाचे अनेकांनी कौतुक केले आहे तसेच अनेकांनी पुस्तक वाटण्यास सुरुवात देखील केली आहे.हिरवे यांच्या या कार्याला मनापासून सलाम.कोणाला मोफत पुस्तकं हवी असल्यास 9920581878 संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.