पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत.
शेतकऱ्यांचा नादच खुळा! रेशीम विक्रीसाठी पिकअपने गेले अन् पैसे घेऊन विमानाने परतले
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230104_085850-780x470.jpg)
कळंब/वाशी : काळ्या मातीत राबणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी विमानात बसून ‘हवाई सफर’ करण्याचा योग तसं पाहिलं तर दुर्लभच; परंतु रेशमाच्या कोशाने ‘लखपती’ झालेल्या दोन शेतकऱ्यांनी मात्र मालवाहू पिकअपमध्ये बसून जाताना हजार किलोमीटरचे अंतर कापलं. तर माल विकून येताना चक्क विमानवारी करत आपलं घर गाठलं आहे. डोक्यानं शेती करत उत्पन्न घेणाऱ्या या जोडीनं ‘शेतकरी पण कमी नाहीत’ हेच यातून दाखवून दिले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
पारंपरिक शेतीला बगल देत काही शेतकरी पीक, त्याचे वाण, लागवड, मशागत, सिंचन आदी संदर्भाने नव्या वाटा धुंडाळत आहेत. लहरी निसर्गाने शेती ”जुगार” ठरत असताना, शाश्वत उत्पन्नाचे मार्ग अवलंबत आहेत. यापैकी तुती लागवड आणि त्यापासूनच्या रेशीम कोशाचे उत्पादन घेऊन आपल्या अर्थकारणाला बळकटी देण्यास काहींना यश आले आहे. तालुक्यातील जवळा खुर्दचे बापू नहाणे हे प्रयोगशील रेशीम उत्पादक शेतकरी स्वतः चॉकी सेंटर पण चालवतात. या सेंटरवर सातत्यानं प्रयोगशील शेतकऱ्यांची ये-जा असते. शेतकऱ्यांना बापू नहाणे हे मार्गदर्शनही करतात. याच दरम्यान, नुकताच त्यांच्या शेतात वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील राजेंद्र इदगे व संकेत जावळे यांचा सत्कार आयोजित केला होता. निमित्त होतं ते इदगे व जावळे यांनी चॉकीपासून शंभर टक्के उत्पादन घेत, रेशीम कोशाच्या विक्रीतून आलेल्या पैशातून विमानवारीचे स्वप्न पूर्ण केल्याचे. यावेळी ‘रेशीम एक्स्प्रेस’ म्हणून रामनगर (कर्नाटक) येथे २५१ वी खेप पूर्ण केल्याबद्दल करपे यांचाही सत्कार करण्यात आला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
खामकरवाडीच्या राजेंद्र इदगे व संकेत जावळे यांनी यंदाच्या तिसऱ्या लॉटचे रेशीम कोश मालवाहू पिकअपमध्ये घालत हजार किमी अंतरावरील रामनगर (कर्नाटक) गाठले. साडेसहाशेच्या दराने माल विकल्यावर इदगेंना ९० हजार, तर जावळेंना दीड लाख मिळाले. यानंतर त्यांनी परतीचा प्रवास विमानाने करण्याचा निर्णय घेतला अन् एसटीने ९० किमी अंतरावरील बंगलोर शहर गाठले. तेथून सकाळी सव्वासहा वाजता विमानाचे प्रस्थान झाले आणि अवघ्या तासाभरात पुण्यात या शेतकऱ्यांची विमान सफर ‘लँड’ झाली. परत, तेथून एसटीच्या लालपरीने आपलं गाव अन् वावर गाठले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
हौसेला मोल नसते म्हणतात. काळ्या वावरात राब राब राबणाऱ्या व एरव्ही दुचाकी, टमटमने, जीपने प्रवास घडणाऱ्या या शेतकऱ्यांची ‘धनिक’ माणसाप्रमाणे एकदा विमानात फिरण्याची मनोधारणा होती. त्यांनी ती आपल्या कष्टाने पूर्णत्वास आणली, असे राजेंद्र इदगे यांनी सांगितले. तर संकेत जावळे यांनी शेतकऱ्यांना कोणी कमी समजू नये, अचूक नियोजन करत डोक्याने शेती व हाताने कष्ट केल्यास शेतकऱ्याची पोरंही नोकरदारांना मागे टाकतात, असे सांगितले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)