![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230104_195259-780x470.jpg)
वाचण्यात आलेला सुंदर लेख
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
इट्स_ओके
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
आनंदाची गुरुकिल्ली…..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
परवा एक चित्रफीत बघितली. त्यात छोटी मुलगी रडत होती. तिच्यापेक्षा थोडासा मोठा भाऊ तिला म्हणत होता, “खोल श्वास घे, *इट्स ओके!*”
बाळ रडायचे थांबले.
“मी जवळ आहे ना, आई येतच असेल, रडू नकोस,” या त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोचल्या.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
ते दोन शब्द खूप आवडले, *”इट्स ओके”* म्हणायचा छंद लागला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
आयुष्यात *”इट्स ओके”* प्रसंग पावलागणिक येतात. तेव्हा “इतकं तर चालायचंच, ठीक आहे, स्वीकारु आणि होऊ पुढे.” म्हणणारे कोणी तरी असावे. नसेल तेव्हा आपणच म्हणावे!
कामवाली बाई कधी सांगून, कधी न सांगता येत नाही. चिडून काय करणार? काम करावेच लागते. मस्त गाणी लावून त्या तालावर काम करावे. काम आवरलं की जास्त छान काम झालं वाटतं. थंडी असेल तर मगभर कॉफी, उकडत असेल तर आइसक्रीम घेऊन मजेत खावं आणि म्हणावे, *इट्स ओके!*
घरातल्या कोणी जेवायचे नाही असे स्वैपाक झाल्यावर सांगितले, की उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवावे, ते सुद्धा कोणतीही चिडचिड न करता. आयत्या वेळी जेवायचे नाही सांगितले, त्यांना उद्या खा सांगावे. *इट्स ओके!*
बरेचदा समोरचा काय सांगतोय ते आपल्याला किंवा आपण काय सांगतोय ते समोरच्याला कळत नाही, लक्षातच येत नाही. त्या वेळी शांत बसावे. थोड्या वेळाने, शक्य असल्यास दुसऱ्या दिवशी सांगावे किंवा विचारावे, लवकर कळते. *इट्स ओके!*
खरेदीला म्हणून खास जावे आणि मनासारखी वस्तू सापडत नाही. वेळ वाया जातो. तेव्हा म्हणावं *इट्स ओके!* नंतर कधी तरी अचानक ती वस्तू सहजपणे मिळते.
कोणाची वाट बघत असू तर ती व्यक्ती वेळेवर येत नाही, भेटत नाही, भेटली तरी भरभरून बोलत नाही. लोकं वेळ पाळत नाहीत त्यामुळे वैताग येतो, विरस होतो. पण म्हणावे, *इट्स ओके!*
कल्पना केलेली नसते अशी व्यक्ती भेटते, जुनी ओळख असावी अशा अकल्पित गप्पा होतात, मस्त वाटतं. असेही होतेच की!
हौसेने आणलेला ड्रेस, साडी एका धुण्यात बाद होते, हरवते किंवा त्यावर काही सांडते. लहान मुलासारखे रडू शकत नाही तरी वाईट वाटतंच. मोठे आहोत म्हणून आरडाओरडा करावा असेही नाही. खोल श्वास घ्यावा आणि म्हणावं, *इट्स ओके!*
एखादा पदार्थ सगळं नीट असूनही बिघडतो. वैताग येतोच. पण म्हणावे, *इट्स ओके!*
घरातले, ऑफिसातले, नात्यातले, परिचयातले एकेकदा उगाच लागेल असे बोलतात. आपण हिरमुसतो, ते त्यांच्या गावीही नसते. त्यावर फार विचार करण्यापेक्षा *”इट्स ओके”* म्हणून सोडून देणे श्रेयस्कर असते.
आपण खूप छान तयार झालेले असतो, कुठेतरी गेलेले असतो, म्हणावी तशी आपली दखल कोणीच घेत नाही. त्यावेळी वैतागण्यापेक्षा *”इट्स ओके”* म्हणणं संयुक्तिक असतं.
मन लावून तासनतास खपून घरातली बाई स्वैपाक करते. जेवणात नीट लक्ष ही न देता जेवून आपलीच माणसे निघून जातात. मागचा पसारा आवरत ती एकटी बसते. सोबत म्हणूनही कोणी थांबत नाही. हे घराघरातील चित्र आहे. हे योग्य नसले तरीही मदतीच्या नावाखाली अजून गोंधळ नको असेल तर *”इट्स ओके”* म्हणाव लागतं.
कधीतरी उगाच उदास, निराश वाटते, कशातही मन लागत नाही, रोजचे रूटीन कंटाळवाणे, नीरस वाटते. त्यात थोडासा बदलही शक्य नसतो. त्यावेळी डोळ्यासमोर एखादे आवडते दृश्य आणावे, जसे एखादा किनारा, एखादी टेकडी, एखादा प्रसंग आणि खोल श्वास घेऊन रोजच्या कामांना नव्याने सुरुवात करावी. म्हणावे, *इट्स ओके!*
माझी सौ. मला म्हणाली, “इतकं आध्यात्मिक आदर्शवादी, समजूतदार वागायची अजिबातच गरज नाही”. तिचे म्हणणे असे की मनाला इतका आवर घालता येत नाही, घालूही नये, रडावेसे वाटले तर रडावे, राग आला की चिडावे, भावना इतक्या आवरू नयेत.
मला म्हणणं असं की, *न आवडणारे किंवा अनपेक्षित काही घडले तरी चिडचिड करून शून्य उपयोग असतो. झालेली गोष्ट बदलता येत नाही, घडणारी गोष्ट आधी कळत नाही, कळली तरी थांबवता येत नाही. फार चिडून, रडून, तक्रार करून फारसा उपयोग नसतो. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वाट बघण्याचा संयम ठेवावा लागतो. मग *”इट्स ओके” म्हणावे.* सोडून द्यायला लगेच आणि नेहमी जमेल असे नसले, तरी प्रयत्न करायला हरकत नाही.
*ही आनंदाची गुरुकिल्ली आहे.*
*इट्स ओके*