पिंपरी -चिंचवडमध्ये उबाठा गटाला धक्क्यावर धक्के ; संजोग वाघेरे यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक रवी लांडगेंचाही जय महाराष्ट्र… आज करणार भाजपात प्रवेश…

चिंचवड (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या पाठोपाठ भोसरी विधानसभेतील माजी नगरसेवक रवी लांडगे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. रवी लांडगे यांच्या भूमिकेमुळे भोसरीत माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांना जोरदार धक्का बसला आहे.
शिवसेना शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले संजोग वाघेरे पाटील हे आज (दि.२०) भारतीय जनता पक्ष जाहीर प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे त्यांचा प्रवेश होणार असून पिंपरी गाव येथून ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ धावडे वस्ती मधील शिवसेना उबाठा गटाचे दिग्गज नेते रवी लांडगे यांनी भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात भाजपात आज जाहीर प्रवेश करणार आहेत. याबाबत आज सकाळी उच्चस्तरीय बैठक झाली. गावकी-भावकी एक रहावी आणि परिसराचा विकास व्हावा, यावर एकमत करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘शब्द’ आणि पक्षाचे हित लक्षात घेवून हा मोठा निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
आज मुंबई येथे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काही वेळातच हे सर्व प्रवेश होणार आहेत.



