१७ वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा; वागदरीतील ‘१० ब’ माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या शालेय आठवणी
वागदरी (सचिन बंगरगी) :
काळ पुढे सरकला, जबाबदाऱ्या वाढल्या; मात्र शालेय जीवनातील निरागस आठवणी आणि मैत्रीची ओढ आजही तितकीच घट्ट आहे, याचा प्रत्यय वागदरीत आला. श्री. एस. एस. शेळके प्रशाला, वागदरी येथील सन २००८ मधील ‘१० ब’ तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल १७ वर्षांनंतर स्नेहसंमेलनाचे आयोजन करत ‘मित्रांची शाळा’ पुन्हा एकदा भरवली.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेची घंटा वाजवून करण्यात आली. मुख्याध्यापक अनिल देशमुख यांच्या सूचनेनुसार सर्व माजी विद्यार्थी रांगेत उभे राहून राष्ट्रगीत व प्रतिज्ञा म्हणाले. त्यानंतर गावंडी सर यांनी हजेरी घेतली व नेहमीप्रमाणे दैनंदिन परिपाठ झाला. या अभिनव संकल्पनेमुळे उपस्थितांना पुन्हा एकदा शालेय जीवनाचा अनुभव घेता आला.
या वेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरुजनांचा गुलाबपुष्प, हार, श्रीफळ व ‘ऋणानुबंध पत्र’ देऊन भावपूर्ण सत्कार केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अलुरे सर होते. विद्यार्थ्यांनी समाजात नावलौकिक मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले. जावळे सर व पवार मॅडम यांनीही मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
“शाळेने दिलेल्या संस्कारांमुळेच आम्ही आज आयुष्यात इथपर्यंत पोहोचू शकलो,” असे भावनिक उद्गार माजी विद्यार्थी सचिन बंगरगी यांनी काढले.

शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत २००८ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी प्रशालेला एक कलर प्रिंटर भेट दिला. याच वेळी माजी विद्यार्थी लक्ष्मीपुत्र कलशेट्टी यांनी आई-वडील नसलेल्या विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारत स्तुत्य निर्णय जाहीर केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी भिसे व ज्योती शिरगण यांनी केले, तर आभारप्रदर्शन सुजाता घुले यांनी मानले. विशेष सहकार्य पुजारी सर यांचे लाभले.
या स्नेहसंमेलनाला मुख्याध्यापक अनिल देशमुख यांच्यासह पुजारी सर, अलुरे सर, होठकर सर, मठपती सर, बिराजदार सर, प्रदीप पाटील, गावंडी सर, बागवान सर, प्रधान सर, यमाजी सर, धावणे सर, पी. पोतदार सर, आंदोडगी सर, लंगोट सर, पवार मॅडम, एन. डी. कुलकर्णी, कोळी मॅडम, सोनकवडे सर आदी शिक्षक उपस्थित होते.
तसेच सचिन बंगरगी, महादेव कोटे, लक्ष्मीपुत्र कलशेट्टी, बसवराव ठोंबरे, राजकुमार कटकधोंड, कमलाकर हेबळे, सातलिंग सलगरे, सतीश पोमाजी, सिद्धारुड उळे, श्रीकृण पोमाजी, अर्जुन तलवार, विशाल बिराजदार, परमेश्वर संपुरे, प्रमोद कुंबळे यांच्यासह अनेक माजी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
हा मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता जुन्या मैत्रीचा, गुरु-शिष्यांच्या पवित्र नात्याचा आणि शाळेशी असलेल्या ऋणानुबंधाचा भावनिक सोहळा ठरला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!