पुणे पुन्हा सायकलमय पोलिसांच्या नियोजनामुळे जागतिक स्पर्धा यशस्वी….
‘सायकलींचं शहर’ अशी ओळख मिरवणाऱ्या पुण्याला आता अनेक दशके उलटली आहेत. साठ–सत्तरच्या दशकात सायकलवरून निर्धास्तपणे फिरणारे पुणेकर आज आठवणींतच उरले आहेत. सध्या सुमारे ७२ लाख वाहनांचा भार, सततची वाहतूक कोंडी आणि वेगवान शहरीकरण यामुळे पुण्याची ओळख पूर्णपणे बदलली आहे. काही वर्षांपूर्वी सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक आखण्यात आले होते; मात्र पुनर्विकास, रस्ते रुंदीकरण, पूल, मेट्रो प्रकल्प यांच्या कोलाहलात त्या सायकल ट्रॅकचे अस्तित्वही हळूहळू नाहीसे झाले.
अशा पार्श्वभूमीवर पुण्यात जागतिक दर्जाची ‘पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धा’ होणार, ही बातमी समजताच उत्साहापेक्षा शंका आणि खवचट प्रतिक्रिया अधिक ऐकायला मिळाल्या. रस्त्यांची सद्यस्थिती आणि अष्टौप्रहर असलेले ट्रॅफिक जॅम लक्षात घेता, “या शहरातून सायकल शर्यत कशी काढणार?” असा प्रश्न अनेक पुणेकरांनी उपस्थित केला. मात्र चार महिन्यांच्या सखोल तयारीनंतर पुणे शहर आणि जिल्हा या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीसाठी सज्ज झाले आणि अखेर ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.
या यशाचे श्रेय प्रामुख्याने पुणे शहर पोलिस दल आणि वाहतूक शाखेच्या सूक्ष्म, कौशल्यपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण नियोजनाला जाते. सुमारे पाच हजार पोलिस अधिकारी व अंमलदारांची तैनाती करून केलेल्या व्यवस्थेमुळे नागरिकांची गैरसोय कमीत कमी झाली आणि स्पर्धा विनाअडथळा, सुरक्षित व शिस्तबद्धरीत्या पार पडली.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलिस अंमलदारांनी परस्पर समन्वयातून काम केले. स्पर्धेसाठी आखलेले नियोजन अत्यंत बारकाईने आणि व्यावसायिक पद्धतीने करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक बॅरिकेड्स व अन्य संसाधने पुरविण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
नागरिक व स्पर्धकांच्या सुरक्षिततेसाठी सुमारे १,९०० बॅरिकेड्स उभारण्यात आले. विशेष म्हणजे, एका टप्प्यातील स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर हे बॅरिकेड्स पुढील दिवशीच्या टप्प्यासाठी अन्य ठिकाणी हलविण्याचे नियोजनही काटेकोरपणे राबविण्यात आले. स्पर्धेच्या प्रारंभ व समारोपाच्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर भागांत फक्त स्पर्धेच्या कालावधीतच वाहतूक वळविण्यात आली, यामुळे शहराची दैनंदिन घडी पूर्णपणे विस्कळीत झाली नाही.
खरे तर या स्पर्धेमुळे काही काळासाठी वाहतूक व्यवस्थेवर ताण आला, हे नाकारता येणार नाही. मात्र त्याच वेळी सायकल शर्यत पाहण्यासाठी पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसादही तितकाच महत्त्वाचा ठरला. रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी खेळाडूंना दिलेले प्रोत्साहन, जल्लोष आणि आनंद पाहता पुण्याचा सायकलप्रेमी स्वभाव अजूनही जिवंत आहे, याची प्रचिती आली.
एकूणच, पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धा ही केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, पुणे शहर पुन्हा एकदा ‘सायकलमय’ होऊ शकते, हा आत्मविश्वास देणारा अनुभव ठरला. या स्पर्धेसाठी गेले चार महिने अहोरात्र मेहनत करणाऱ्या सर्व ज्ञात–अज्ञात घटकांचे मनापासून आभार. विशेषतः आपल्या सूक्ष्म नियोजनामुळे ही स्पर्धा यशस्वी करणाऱ्या पुणे पोलिस दलाचे पुणेकरांकडून मनःपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद.
— वाचक : धोंडपा नंदे, वानवडी, पुणे
(सायकल प्रेमी पुण्यात २८ वर्षांपासून सातत्याने सायकल चालवत आहे आजही )
9850619724
Back to top button
×
No WhatsApp Number Found!