दामोदर मोरे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित
सोलापूर : प्रतिनिधी
आविष्कार फाउंडेशन (NGO) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक सेवा कार्यगौरव पुरस्कार २०२६ सिरसदेवी (ता. गेवराई, जि. बीड) येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दामोदर मोरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सेवानिवृत्त सहायक पोलिस उपायुक्त दीपक आर्वे यांच्या हस्ते सोलापूर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
दामोदर मोरे हे गेली अनेक वर्षे जि.प. केंद्रीय शाळा सिरसदेवी येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांनी अनेक अडचणींवर मात करत शाळेच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. स्वखर्चाने शाळेत विविध सुविधा उपलब्ध करून देणे, शाळेची स्वच्छता राखणे, झाडे लावणे, पाण्याच्या हौदाची स्वच्छता करणे तसेच सौरऊर्जेच्या प्लेट स्वतः स्वच्छ करणे अशा कामांमध्ये ते स्वतः पुढाकार घेतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ देऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे कार्यही ते सातत्याने करीत आहेत.
“मराठी शाळा टिकली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी शाळेत रमले पाहिजे” या ध्येयाने प्रेरित होऊन ते कार्य करीत असून गावानेही शिक्षकांबरोबर शाळेच्या विकासात योगदान देणे आवश्यक असल्याचे ते नेहमी सांगतात. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडविणे हा त्यांचा स्वभाव असून त्यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
त्यांचे आई-वडील महादेव मोरे व कलावती मोरे यांनाही मुलाच्या कार्याचा अभिमान वाटत असून समाजाचे ऋण फेडत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. दामोदर मोरे यांच्या कार्यामुळे इतर शाळाही या शाळेचा आदर्श घेत असल्याचे सांगितले जाते. नुकतेच त्यांनी मुख्याध्यापकांसाठी सुसज्ज कार्यालय तयार करून दिले असून विविध अधिकारी शाळेला भेट देऊन त्यांच्या कार्याचे कौतुक करीत आहेत.
या पुरस्कार सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन वायकुळे, संस्थापक अध्यक्ष संजय पवार, विशेष निमंत्रित प्रमोद तमनावर, बापूराव जमादार, रेखा सोनकवडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले.
या वेळी दामोदर मोरे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे मित्र हरिओम कदम, रोहित कदम, सचिन मुळांडे, सुयश टाकळकर, शाहेद अत्तार, इस्माईल शेख, अल्ताफ शेख, आरिफ शेख, अली शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर दामोदर मोरे यांनी हा सन्मान शाळेतील आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी, आई-वडील तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांना समर्पित करत कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल गावकऱ्यांसह शिक्षक, अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सिरसदेवी गावाचा अभिमान ठरलेल्या दामोदर मोरे यांच्या कार्यातून समाजाला प्रेरणा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!