गावगाथा

गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेस सोमवारपासून प्रारंभ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

रथोत्सव यात्रा विशेष

गोगांव येथे श्री कल्लेश्वर महाराज यात्रेस सोमवारपासून प्रारंभ; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुक्यातील गोगांव येथील ग्रामदैवत श्री कल्लेश्वर महाराज यांच्या वार्षिक यात्रेस सोमवार, ६ एप्रिलपासून उत्साहात प्रारंभ होत असून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी सरपंच सौ. वनिता सुरवसे यांनी दिली.


गावाच्या श्रद्धास्थान असलेल्या श्री कल्लेश्वर महाराजांची यात्रा दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरी केली जाते. यावर्षीही ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्रेचे नियोजन करण्यात आले असून भाविकांसाठी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी ठीक ८ वाजता उच्चई (लहान रथ) श्री कल्लेश्वर मंदिरापासून हनुमान मंदिरापर्यंत नेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
मंगळवार, ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता रथावर कळसारोहण करण्यात येणार असून सायंकाळी ८ वाजता पारंपरिक रथोत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. त्यानंतर रात्री भाविकांच्या मनोरंजनासाठी कन्नड नाटकाचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
बुधवार, ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता जंगी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याच दिवशी रात्री पुन्हा कन्नड नाटकाचा कार्यक्रम होणार आहे.


यात्रेनिमित्त भाविकांसाठी ७ व ८ एप्रिल २०२६ रोजी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जागृत देवस्थानाचे दर्शन घ्यावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button