आयआयटीमध्ये सी. बी. खेडगी महाविद्यालयाचा प्रथमच प्रवेशाचा विक्रम
IIT खरगपूर व IIIT रांचीमध्ये दोन विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; अक्कलकोटच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण
| दि. १९
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयाने आपल्या इतिहासात प्रथमच भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (IIT) प्रवेश मिळवण्याचा मान पटकावला आहे. महाविद्यालयाचा विद्यार्थी विपुलराज विशाल प्रधान याने प्रतिष्ठेच्या IIT खरगपूर येथे, तर आदित्य गुरुशांत चौधरी याने IIIT रांची येथे प्रवेश मिळवून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण स्वअभ्यास आणि जिद्दीच्या बळावर JEE Main व त्यानंतरच्या JEE Advanced परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यातून देशातील नामांकित तांत्रिक संस्थांमध्ये प्रवेश निश्चित करत त्यांनी केवळ महाविद्यालयाचाच नव्हे, तर अक्कलकोट तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राचाही नावलौकिक उंचावला आहे.
या ऐतिहासिक यशानिमित्त संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल, फेटा, पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, ज्योती धरणे, प्रभारी प्राचार्य डॉ. अंकुश शिंदे, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक निलप्पा भरमशेट्टी आदी उपस्थित होते.
उपप्राचार्या वैदेही वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत, ग्रामीण भागातील विद्यार्थीही गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करू शकतात, हे या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ. सिद्धार्थ मुरूमकर, प्रा. जयश्री बिराजदार, प्रा. श्रीकांत जिड्डीमनी, प्रा. श्रीमंत बुक्कानुरे, प्रा. दिलीप कांबळे, दिनेश धाराशिवकर, प्रा. यशोदा इळगेर, प्रा. वर्षाराणी हत्ताळी आणि प्रा. विजया कोन्हाळी उपस्थित होते.
कोट
“सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी IIT आणि IIIT मध्ये प्रवेश मिळवून संस्थेचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचविला आहे. हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”
— बसलिंगप्पा खेडगी, चेअरमन, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी
Back to top button
×
No WhatsApp Number Found!