स्वामीभक्ती प्रचार-प्रसार कार्यातून मानव धर्माचा प्रसार होत आहे – म.नि.प्र.अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजीं
मंदिर समितीचे व्यवस्थापन पाहून महास्वामीजींनी व्यक्त केले मनोगत.

स्वामीभक्ती प्रचार-प्रसार कार्यातून मानव धर्माचा प्रसार होत आहे – म.नि.प्र.अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजीं

या कार्यास महेश इंगळे यांचे मोठे योगदान.

मंदिर समितीचे व्यवस्थापन पाहून महास्वामीजींनी व्यक्त केले मनोगत.

स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरी ही स्वामी समर्थांच्या प्रत्यक्ष अवतार कार्यातून व त्यांच्या कार्य कुशलतेतून प्रचलित झालेली नगरी आहे. त्यामुळे स्वामी समर्थांचे असंख्य भक्त आहेत, जे त्यांच्या मूळस्थानी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरिता नियमितपणे येत असतात. आलेल्या या सर्व भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शनाची सोय मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. या कार्यातून स्वामी समर्थांच्या भक्ती प्रचार प्रसार कार्याचा विस्तार होत आहे, म्हणून स्वामी भक्ती प्रचार प्रसार कार्यातून एका अर्थाने मानव धर्माचाच प्रसार होत असल्याचे प्रतिपादन कर्नाटकातील मादनहिप्परगा येथील शिवलिंगेश्वर विरक्तमठाचे परमपूज्य म.नि.प्र.अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजीं यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना मानव धर्माच्या या कार्यास मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या समर्पणाचे फार मोठे योगदान असल्याचे सांगितले. पुढे बोलताना महास्वामीजी यांनी श्री स्वामी समर्थांच्या १४५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त मंदिर समितीकडून सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा आढावा घेऊन अत्यंत आनंद व्यक्त करीत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी त्यांच्या सोबत बसलिंगय्या स्वामी, सिद्धाराम अरळीमारे, शिवराज बिराजदार, राजेंद्र कुंभार, बसवराज पाटील, चंद्रु हडलगी, दरेप्पा गुळगी, चंद्रकांत बिराजदार, संतोष पराणे, प्रदीप हिंडोळे, राजशेखर हिप्परगी, खाजप्पा झंपले, समर्थ पराणे, सोमशेखर जमशेट्टी, मंदिर समितीचे आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, सागर गोंंडाळ, विपुल जाधव आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – म.नि.प्र.अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा वटवृक्ष मंदिर कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
