IAS ची नोकरी सोडून खासदारकीची केली हॅट्रिक ! सायकलने करतात प्रवास ‘जाणून घ्या’ कोण आहेत नवीन कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल
IAS ची नोकरी सोडून खासदारकीची केली हॅट्रिक ! सायकलने करतात प्रवास ‘जाणून घ्या’ कोण आहेत नवीन कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल

IAS ची नोकरी सोडून खासदारकीची केली हॅट्रिक ! सायकलने करतात प्रवास ‘जाणून घ्या’ कोण आहेत नवीन कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल
——–
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय सरकारमधील वरिष्ठांनी घेतल्याचे समजते. यानुसार किरेन रिजिजू यांच्याकडून कायदे मंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. रिजिजू यांच्याकडे आता भूविज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कायदे मंत्रीपदी आता अर्जुन राम मेघवाल यांनी वर्णी लागली आहे. आयएएस राहिलेल्या मेघवाल यांचा राजकीय प्रवास अतिशय रंजक आहे.

अर्जुन राम मेघवाल हे राजस्थानच्या बिकानेरमधून खासदार आहेत. मेघवाल हे भाजपमधील मोठ्या दलित चेहऱ्यांपैकी एक आहेत. मात्र आजही त्यांच्या साध्य राहणीमानाचे प्रत्येक राजकारणी कौतुक करताना दिसतो. मेघवाल यांचा जन्म ७ डिसेंबर १९५४ रोजी बिकानेरच्या किसमिदेसर गावात झाला. त्यांनी 1977 मध्ये बीकानेरच्या डुंगर कॉलेजमधून बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी याच महाविद्यालयातून १९७९ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

सर्वकाही सुरळीत सुरु असताना मेघवाल यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने प्रत्यन देखील सुरु केले. 1982 मध्ये, त्यांनी आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची राजस्थान औद्योगिक सेवेसाठी निवड झाली. मेघवाल यांची जिल्हा उद्योग केंद्रात सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी राजस्थानमधील झुंझुनू, ढोलपूर, राजसमंद, जयपूर, अलवर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये काम केले.

राजकारणाशी आला संबंध
अर्जुन राम मेघवाल यांच्या कार्याची दखल घेत 1994 मध्ये त्यांची राजस्थानचे तत्कालीन उपमुख्यमंत्री हरिश्चंद्र भाभा यांच्याकडे ओएसडी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याच वर्षी राजस्थान इंडस्ट्री सर्व्हिस पॅरिसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.पुढे त्यांनी डॉ. आंबेडकर मेमोरियल वेल्फेअर सोसायटी, राजस्थानच्या सरचिटणीसपदाची निवडणूक जिंकली.

IAS पदावरून घेतली निवृत्ती
मेघवाल यांनी IAS मध्ये पदोन्नती देखील मिळवली आणि अनेक प्रशासकीय पदे भूषवली. ज्यामध्ये संचालक पदापासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंतच्या अनेक पदांचा पदभार त्यांनी सांभाळला. मात्र यांनतर राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांनी स्वइच्छेने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

सुरु झाला राजकीय प्रवास
2009 मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. खरेतर, 2009 मध्ये ते बिकानेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधीत्व करणारे खासदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये, ते बिकानेर मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आले. ते केंद्र सरकारमध्ये वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री, संसदीय कामकाज मंत्री, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री होते. 5 जुलै 2016 रोजी मेघवाल यांनी अर्थ राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
वस्तू आणि सेवा कराच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मेघवाल सलग तिसऱ्यांदा बिकानेरमधून खासदार म्हणून निवडून आले. खासदारकीची हॅट्रिक करणाऱ्या मेघवाल यांच्यावर मोदी सरकारने पुन्हा विश्वास टाकत कायदे मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली आहे.
अर्जुन राम मेघवाल यांना सरकारने वाहन दिले आहे, मात्र आजही ते सायकलवरून प्रवास करणे पसंत करतात. आजही मेघवाल कारऐवजी सायकलने संसदेत जातात. ‘ग्राउंड टू अर्थ’ अशी मेघवाल यांची ओळख त्यांनी आजही जपली आहे.