विधमान आमदारांमधून कोण होणार खासदार.. सातपुते व शिंदे यांच्यात लक्षवेधी लढतीत कोण मारणार बाजी…
लक्षवेधी लढत

विधमान आमदारांमधून कोण होणार खासदार.. सातपुते व शिंदे यांच्यात लक्षवेधी लढतीत कोण मारणार बाजी…

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे आमदार राम सातपुते तर कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या आमदार प्रणिती शिंदे या दोन तरुण आमदारांमध्ये लक्षवेधी लढत होत आहे. आजवर या मतदारसंघात ५ वेळा भाजप तर कॉंग्रेसला ११ वेळा जनतेने कौल दिला आहे.
सोलापूरचे आजपर्यंतचे खासदार म्हणून सन १९५२ शंकरराव मोरे (शेतकरी कामगार पक्ष), १९५७ ला बाळासाहेब मोरे हे संयुक्त महाराष्ट्र समितीकडून, १९६२ ला अप्पासाहेब काडादी (कॉंग्रेस), १९६७ ते १९७७ पर्यंत सुरजरत्न दमाणी (कॉंग्रेस), १९८० ते १९८४ मध्ये गंगाधरपंत कुचन (कॉंग्रस) त्यानंतर १९८९ ते १९९१ पर्यंत धर्मण्णा सादूल (कॉंग्रेस), सन १९९६ ला लिंगराज वल्याळ (भाजपा), १९९८ व १९९९ पर्यंत सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस), सन २००३ मध्ये प्रतापसिंह मोहिते –पाटील (भाजपा), २००४ मध्ये सुभाष देशमुख (भाजपा) २००९ मध्ये सुशीलकुमार शिंदे (कॉंग्रेस), २०१४ मध्ये अँड.शरद बनसोडे (भाजपा), सन २०१९ मध्ये डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी भाजपा कडून विजय झाले होते.
कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्व. लिंगराज वल्याळ हे सन १९९६ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातून भाजपाचे पहिले खासदार म्हणून निवडून आले होते. सन १९८० आणि १९८४ या दोन्ही निवडणुकीमध्ये गंगाधरपंत कुचन हे अनुक्रमे १ लाख ६०६ व १ लाख ९० हजार ६३२ मताधिक्याने निवडून आले होते. तर १९८९ आणि १९९१ या दोन्ही निवडणुकीमध्ये धर्मण्णा सादूल हे १ लाख ३५ हजार आणि ८० हजार मताधिक्याने निवडून आले होते. सन १९९० च्या दशकात भाजपाचे प्राबल्य वाढलेले नव्हते.
सन १९९८ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे हे १ लाख ४ हजार मताधिक्याने तर १९९९ मध्ये ७६ हजाराचे मताधिक्याने विजय झाले होते. सन २००४ मध्ये भाजपच्या सुभाष देशमुख यांनी कॉंग्रेसच्या उज्वला शिंदे यांचा पराभूत केले. सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे आणि अँड.शरद बनसोडे यांच्यात सामना झाला. यावेळी शिंदे यांना ९९ हजाराचे मताधिक्य मिळाले होते. आणि ते तिसऱ्यांदा खासदार झाले.
२०१३ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी कॉंग्रेसकडून निवडणुक लढविली होती. त्या निवडणुकीत भाजपाचे प्रतापसिंह मोहिते –पाटील हे १ लाख २२ हजाराचे मताधिक्याने विजय झाले. सन २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा सलग दोन वेळा पराभव झाला होता.
सन २०१४ च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात मोदी लाटेत अँड.शरद बनसोडे हे १ लाख ४९ हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले. तर २०१९ च्या निवडणुकीत डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी, सुशीलकुमार शिंदे आणि वंचित कडून अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली. यामध्ये १ लाख ५८ हजार मताधिक्याने डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी हे विजयी झाले. अँड.शरद बनसोडे व डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी हे अक्कलकोट तालुक्याचे असल्याने त्यांना या मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळालेले होते.
२०२४ च्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या दोन तरुण आमदारांमध्ये लक्षवेधी लढत होत असून, या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून राहिले आहे.
