गावगाथा

श्री स्वामी समर्थांची सेवा करुन आपले जीवन धन्य करुन घ्यावे – कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज

श्री.वटवृक्ष मंदीरातील धर्म संकीर्तन महोत्सवात नारदीय कीर्तन सेवेतून समाधान महाराजांचे निरूपण.

श्री स्वामी समर्थांची सेवा करुन आपले जीवन धन्य करुन घ्यावे – कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज

  • श्री.वटवृक्ष मंदीरातील धर्म संकीर्तन महोत्सवात नारदीय कीर्तन सेवेतून समाधान महाराजांचे निरूपण.

(अक्कलकोट, दिनांक ३/५/२४)
(विशेष शब्दांकन – श्रीशैल गवंडी)

हरि प्राप्तीसी उपाय | धरावें संतांचे ते पाय ||
तेणें साधती साधने | तुटती भवाची बंधने ||
संताविण प्राप्ती नाही | ऐसी वेद देती ग्वाही || एका जनार्दनीं संत | पूर्ण करिती मनोरथ ||
या संत एकनाथ महाराजांच्या अभंगाद्वारे
तुळजापूरचे सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार
ह.भ.प.समाधान महाराज कदम यांनी नारदीय कीर्तन सेवेतून श्री भगवंताचा महिमा व संतांचा महिमा वर्णिला.श्री हरीच्या प्राप्तीने सकल दुःखाची निवृत्ती व संपूर्ण सुखाची प्राप्ती होत असते. श्री हरिची प्राप्ती केवळ मनुष्य देहातच होत असते. मनुष्य देह खुप दुर्लभ आहे. आपण जन्माला येण्या आगोदर कुठे होतो कोणत्या शरीरामध्ये होतो पशु होतो की प्राणी काहीच माहिती नाही आणि मृत्यु नंतर कुठे जाणार हे ही माहिती नाही. पण केवळ भगवंताच्या कृपेनेच आपल्याला मनुष्य देह प्राप्त झाला आहे.
अतिशय दुर्लभ योगी तपस्वी यांना ही भगवंताची प्राप्ती दुर्लभ आहे. पण जर संतांची सेवा केली तर भगवंत लगेच प्राप्त होतात. येथील अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज ही आपल्या अगम्य लिलेने व भक्तीच्या परिसीमेने संतत्व प्राप्त केलेले श्रेष्ठ संत आहेत, म्हणून भाविकांनी
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांची सेवा करुन आपले जीवन धन्य करुन घ्यावे असे निरूपण तुळजापूर येथील सुप्रसिद्ध नारदीय कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज कदम यांनी केले. श्री स्वामी समर्थांच्या १४६ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंकिर्तन महोत्सवात आज नारदीय कीर्तन सेवेच्या माध्यमातून धर्म संकीर्तन महोत्सवाचे दहावे पुष्प कीर्तनकार ह.भ.प.समाधान महाराज कदम यांनी गुंफले. कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. समाधान महाराज कदम व सहकाऱ्यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. पुढे बोलताना ह.भ.प. समाधान महाराज कदम यांनी
श्री.संत स्वामी समर्थ महाराजांचा महिमा सांगत अंनत कोटी ब्रम्हांड नायक म्हणजे एक पृथ्वी व तिच्या भोवती असणारे सौर मंडल जसे एक सूर्य, एक चंद्र व अनेक ग्रह व अनेक तारे ह्या सर्वांना मिळून एक ब्रह्मांड म्हणतात, तसे अनेक पृथ्वी, अनेक चंद्र, अनेक सूर्य, अनेक ग्रह असे आकाश मंडलामध्ये अंनत कोटी ब्रम्हांड आहेत. अश्या संपूर्ण ब्रम्हांडाचे नायक व ही उपाधी सांभाळण्याचे सामर्थ्य श्री स्वामी महाराजांमध्ये आहे, म्हणून त्यांना अंनत कोटी ब्रम्हांड नायक असे म्हणतात, म्हणून स्वामी समर्थ रुपी संत सेवा केल्याने सगळी साधने सफल होतात, त्यामुळे अन्य साधना करण्याची आवश्यकता भासत नाही.
असेही निरूपण कीर्तन सेवेच्या उत्तरार्धात
ह.भ.प.समाधान महाराज यांनी केले.
या कीर्तन सेवेत त्यांना मृदूंगावर ह.भ.प.कृष्णा महाराज धनके व ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम, संवादिनीवर मयूर स्वामी, गायन सेवेत ह.भ.प.राम महाराज लुंगसे व ह.भ.प. हनुमंत महाराज लुंगसे, तर टाळवर पिंपळा खुर्द गावातील हरिपाठ मंडळ यांनी साथ संगत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार पाठक यांनी केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ, भीमराव भोसेकर, मल्लिनाथ बोधले, मंदार महाराज पुजारी, अमर पाटील, प्रसाद किलजे, मोहन जाधव, शिवशरण अचलेर, प्रसाद पाटील, दर्शन घाटगे, संतोष पराणे, चंद्रकांत गवंडी, काशिनाथ इंडे, प्रकाश कासेगावकर,
सुरेखा तेली, सुवर्णा जाधव, कौशल्या जाजू, उज्वलाताई सरदेशमुख, निंगूताई हिंडोळे, सौरभ आपटे, दयावान पाटील, जयंत खेडकर, प्रसाद नागवेकर, उत्तम पिंगळे, आदींसह अनेक भाविक भक्तांनी उपस्थित राहून या कीर्तन श्रवण सेवेचा लाभ घेतला.

फोटो ओळ – धर्मसंकीर्तन महोत्सवाच्या व्यासपीठावर कीर्तन सेवा सादरीकरण करताना ह.भ.प.समाधान महाराज कदम व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button