वाकड : धक्कादायक प्रकार ; पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र पाडून कुलूप लावणाऱ्या नराधमाचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या
निगडी (प्रतिनिधी) : वाकड परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्या गुप्तांगाला खिळ्याने छिद्र पाडून कुलूप लावले. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

याप्रकरणी 28 वर्षीय पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 30 वर्षीय पतीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी पती वारंवार मारहाण करत होता. 11 मे रोजी रात्री कामावरून आल्यानंतर त्याने पुन्हा पत्नीला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली. ब्लेडने गुप्तांगावर वार करून गंभीर जखमी केले. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पत्नीला ओढणीच्या सहाय्याने बांधून पतीने लोखंडी खिळ्याने पत्नीच्या गुप्तांगाला छिद्र करून कुलूप लावले.

या अमानवी प्रकारामुळे वाकड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दाम्पत्य मूळचे नेपाळ येथील असून आरोपी पती पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. तर फिर्यादी महिला घरकाम करत होती. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. वाकड पोलीस पुढील तपास करीत आहेत.
