अक्कलकोट तालुका व शहरात आधार ईसेवा केंद्र तात्काळ सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – लहुजी शक्ती सेनेचा इशारा
निवेदन


अक्कलकोट तालुका व शहरात आधार ईसेवा केंद्र तात्काळ सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा – लहुजी शक्ती सेनेचा इशारा

अक्कलकोट (प्रतिनिधी) – अक्कलकोट तालुका तसेच शहरामध्ये नागरिकांना आधार कार्ड संदर्भात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नविन आधार नोंदणी, दुरुस्ती व इतर सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अक्कलकोट तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ आधार सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख वसंत देडे आणि जिल्हाध्यक्ष नागेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, अनेक महिन्यांपासून आधार सेवा ठप्प असून, ग्रामपंचायतीपासून ते शहरी भागातील नागरिक विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. आधार नोंदणी व दुरुस्ती आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना, महिला व गरजूंना याचा विशेष फटका बसत आहे.

“नागरिकांना मूलभूत सेवा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वच शासकीय व बँकिंग व्यवहारासाठी अनिवार्य झाले आहे. त्यामुळे हे केंद्र त्वरित सुरू करावे अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनाच्या प्रतीची प्रत जिल्हाधिकारी व संबंधित उच्च अधिकाऱ्यांनाही देण्यात येणार असल्याचे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांतही योग्य कारवाई न झाल्यास अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती या वेळी देण्यात आली.