Akkalkot : राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढविणार ; पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षांची माहिती

अक्कलकोट (प्रतिनिधी ) : सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती तसेच महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू केली असून महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातील १०४ विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, पंढरपूर – मंगळवेढा, माळशिरस, सांगोला, मोहोळ, करमाळा, माढा या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढण्याची सुचना पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे. त्यामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून. त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.

अक्कलकोट तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष तसेच महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. स्वबळावर लढण्याच्या निर्णयामुळे अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत रंगतदार लढत होणार ही चर्चा सुरू झाली आहे. पक्षश्रेष्ठीचा आदेश आल्यास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात ताकदीनिशी लढविणार असून अक्कलकोट विधानसभा निवडणुकीत कोणता उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षातर्फे निवडणूक लढविणार याची उत्सुकता लागली आहे. कालच्या परभणी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेवजी जानकर यांचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. कार्यकर्त्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढविण्याची मागणी करीत आहेत.
