Pune Crime: “तू कुत्ता है” असा व्हाट्सअप डीपी ठेवल्यामुळे तरूणावर वार ; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे (प्रतिनिधी): वॉट्सअॅपला डीपीवर “तु कुत्ता है”, असा डीपी ठेवणार्या तरुणावर टोळक्याने हल्ला केला आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा प्रकार ४ डिसेंबरच्या मध्यरात्री सय्यदनगर येथे घडला आहे.

यावेळी टोळक्याने हातात कोयते घेऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करून दुचाकीवरून निघून गेले.


याप्रकरणी आरीफ उर्फ तालीम आसमहंमद (वय २३), साहिल खान (वय २०), टप्पू खान (वय १९), आयान आरीफ शेख (वय १९), गुलाम गौसखान (वय २२, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर इक्बाल शेख (१९, रा. गल्ली नंबर 28, सय्यदनगर, महमंदवाडी रोड, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली.


पोलिसांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास समीर व मित्र आयान इरफान शेख, अस्लम, फरदिन असे गल्ली नंबर 28 येथे बोलत थांबले होते. तेव्हा मुख्य आरोपी तालीमसह त्याचे साथीदार टोळके तेथे आले. तालीमचे आणि तक्रारदार याच्या एका मित्राचे पूर्वीपासुनचे वाद होते. तसेच वॉट्सअॅपवर समीरने तु कुत्ता है असा डीपी ठेवल्याचा राग होता. त्यातून तालीम आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने समीर शेखवर सपासप वार करत खुनाचा प्रयत्न केला. तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यावेळी लोखंडी कोयते हवेत फिरवून टोळके दुचाकीवर पसार झाले. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी गुलाम गौस खान व आयान आरीफ शेख यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत.