” शाळेची वाजली पुन्हा घंटी, ताज्या झाल्या जुन्या आठवणी ”
अनंत चैतन्य प्रशालेत ” माजी विद्यार्थी मेळावा “आनंदात साजरा—
—————————————-
लहानपणी अभ्यासाच्या भीतीने,शिक्षकांच्या धाकाने नको नकोशी वाटणारी शाळा मात्र मोठेपणी कशी हवीहवीशी वाटते याचा अनुभव प्रत्येकांना आला कारण बनले महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था, अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.व उच्च माध्यमिक प्रशालेच्या रविवार दिनांक १ जुन २०२५ रोजी भरलेल्या “माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे ” सन २००५-०६ मध्ये इ. १० वीत शिकलेले जवळपास पन्नास विद्यार्थी १९ वर्षानी पुन्हा एकत्र जमले असल्याने परत भेटत असल्याचा आनंद एकमेकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.प्रारंभी या सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेचे माजी प्राचार्य श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे औक्षण करुन गुलाबपुष्प उधळत स्वागत केले. सुरुवातीला गीतांजली हेगडे व लक्ष्मी हेगडे यांनी उपस्थित सर्वांचे शब्द सुमनांनी स्वागत केले.
यानंतर विद्यादेवी सरस्वती व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आदरणीय पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या प्रतिमेचे पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले. व याचवेळी प्रशालेचे दिवगंत शिक्षक व माजी विद्यार्थी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रशालेचे माजी प्राचार्य श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी व उपस्थित सर्व आजी- माजी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे फेटा, शाल, भेटवस्तू व बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी ज्योती मसरे , महादेव बनसोडे, संगिता हेगडे, स्वप्नील फटाले,प्रदीप भरमशेट्टी यांनी शालेय जीवनातील आपले गंमतीशीर किस्से व सोबतच त्यावेळी शाळेकडून गिरवले गेलेले संस्काराचे धडे कसे आपल्या जीवनात उपयोगी पडत आहेत याचा अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केला.यानंतर सेवानिवृत्त शिक्षक श्री.चंद्रकांत व्हनमाने, श्री. बसवराज बंडगर व श्री.बापुजी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.यानंतर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी ” अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणाऱ्या या ज्ञान मंदीरातील ज्ञान ज्योत अखंडपणे तेवत राहावी अशा भावनेने या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला भेटस्वरुपात दिल्या गेलेल्या पितळी समईबद्दल या विद्यार्थ्यांचे कौतुक करून आभार मानले व आजचा हा सोहळा केवळ “माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नव्हे तर आमच्याप्रतीचा हा कृतज्ञता सोहळा आहे ” असा भाव आपल्या भाषणातून व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या या उत्तम अशाप्रकारच्या नियोजनरित्या केलेल्या कार्यक्रमाबद्दल अभिनंदन केले.यानंतर प्रशालेचे माजी प्राचार्य व मार्गदर्शक श्री. सिद्धेश्वर कल्याणशेट्टी सरांच्या हस्ते प्रशालेच्या प्रांगणात ” वृक्षारोपण ” करण्यात आले.याप्रसंगीआजी- माजी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व माजी विद्यार्थी यांनी एकत्रितपणे स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर वर्ग भरवण्यात आले. एरवी अभ्यास न केल्याने शाळा चुकवणारे, अर्ध्यातून पळून जाणारे माजी विद्यार्थी आजच्या वर्गात मात्र आवर्जून हजर होते व छडीला घाबरून हात चुकवणारी, सर हळू मारा असे म्हणणारी मुले- मुली आज मात्र शिक्षकांचा मार खाण्यासाठी आसुसल्याचा प्रत्यय आज आला. यावेळी श्री. ज्ञानदेव शिंदे, श्री.सरदार मत्तेखाने,मुख्याध्यापक श्री. अशोक साखरे यांनी पुन्हा एकदा शिकत असल्याचा आनंद या विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिला.यानंतर या सर्व मुलां- मुलींनी खो-खो, संगीत खुर्ची, तळ्यात- मळ्यात, समुह नृत्य असे विविध खेळ खेळत आजचा हा स्नेहमेळावा आनंदमय वातावरणात साजरा केला.यावेळी हन्नूरचे उपसरपंच व युवा नेते सागर कल्याणशेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली तेंव्हा या विद्यार्थ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल हताळे यांनी व सुत्रसंचालन चन्नवीर हेगडे ,प्रियांका भरमशेट्टी यांनी केले तर आभार सिद्धाराम गोगावे यांनी मानले. हा स्नेहमेळावा यशस्वीपणे संपन्न व्हावा यासाठी नागेश कलशेट्टी,सिद्धाराम हेगडे,रमेश छत्रे, लक्ष्मण पारतनाळे, महादेव पाटील, रियाज खुजादे, उमेश इरवाडकर, ज्योती चिकणे,संगिता हेगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!