उजनी धरणातून शेतीसाठी २० जानेवारीनंतर पाणी! मार्च ते मेपर्यंत सुटेल दुसरे आवर्तन
उजनी धरणात सध्या १११ टक्के पाणीसाठा आहे
उजनी धरणातून शेतीसाठी २० जानेवारीनंतर पाणी! मार्च ते मेपर्यंत सुटेल दुसरे आवर्तन*
सोलापूर : उजनी धरणात सध्या १११ टक्के पाणीसाठा आहे. रब्बी पिकांसाठी उजनीतून पहिले आवर्तन २० जानेवारीनंतर सोडले जाणार आहे. तसेच २५ मार्च ते २५ एप्रिल आणि तेथून पुढे २० मेपर्यंत एकच मोठे आवर्तन सोडले जाईल. त्यावर कालवा सल्लागार समितीत अंतिम निर्णय होणार आहे.
उजनी धरण जिल्ह्यासाठी वरदान ठरले असून, रब्बीच्या जिल्ह्यात खरीप पिकांखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील शेतीला कॅनॉलद्वारे पाणी मिळते. बार्शी उपसा सिंचन योजना, शिरापूर, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून आणि बोगद्यातून देखील पाणी वितरीत होते. धरणावरून जिल्ह्यातील जवळपास पावणेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सोलापूर शहराला देखील उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. त्याशिवाय बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसींना आणि लातूर, उस्मानाबाद शहरालाही उजनीतूनच पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात शेती व जनावरांची तहान भागविण्यात उजनीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या कमी होऊन हरितक्रांतीची मुहूर्तमेढ उजनीनेच रोवली. त्यामुळेच राज्यात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूरचा नावलौकिक देशभरात झाला. मागील तीन-चार वर्षांत उन्हाळ्यात जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासाठी एकही टॅंकर लागलेला नाही, तेही उजनीमुळेच. यंदा पावसाळ्यात उजनी धरणावरील जलविद्युत केंद्रातून १.५५ कोटी वीजनिर्मिती व्हावी, असे टार्गेट दिले होते. पण, पावसाळ्यात तब्बल तीन कोटी युनिट वीज तयार करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक वीजनिर्मिती ठरली आहे.
⚜️ *कालवा सल्लागार समितीत ठरेल नियोजन* ⚜️
उजनीत सध्या १११ टक्के पाणीसाठा आहे. रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासंदर्भात पुढील महिन्यात पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होईल. त्यामध्ये पाणी सोडण्याचे अंतिम निर्णय होणार आहे.
*- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर*