यशोगाथा

गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा..

वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा.

 

 

( sangola)गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा.. तालुक्यातील इमडेवाडीच्या (imdevadi) एका शेतकऱ्यानं अपार कष्टानं एखाद्या कार्पोरेट कंपनीलाही लाजवेल असा उद्योग केला आहे. प्रकाश इमडे (Prakash Imday) असं या शेतकऱ्याचे नाव आहे. ते दूध आणि शेणातून वर्षाला तब्बल दीड कोटी रुपयांचा उत्पन्न घेत आहेत. त्यांनी या उत्पन्नातून टोलेजंग असा एक कोटी रुपयांचा बंगला देखील बांधला आहे. पाहुयात इमडेवाडीच्या प्रकाश  नेमाडेंची यशोगाथा..

प्रकाश इमडेंना वडिलोपार्जित चार एकर कोरडवाहू जमीन होती. तसेच त्यांच्याकडं एक गाय होती. त्या एका गायीपासून सुरु केलेल्या दूध व्यवसायात आज तब्बल 150 गायींमध्ये रुपांतरीत झाला आहे. प्रकाश इमडे हे रोज एक हजार लिटर दूध डेअरीला देत आहेत. एखाद्या कार्पोरेट कंपनीला लाजवेल असे नियोजन केल्यामुळं या अशिक्षित शेतकऱ्याने अल्पावधीत आपलं वेगळं वैभव उभं केलं आहे.
दूध आणि शेणातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न घेणाऱ्या या प्रकाशबापूंशी बोलताना त्यांच्या अफाट अनुभव आणि अद्ययावत तंत्रज्ञानाची सांगड घालून व्यवसाय कसा करावा याचे धडे तरुणांना मिळू शकतात. सांगोला तालुक्यातील इमडेवाडी या गावातील प्रकाश इमडे हे अल्पभूधारक शेतकरी. मात्र, त्यांनी आपल्या एका गायीपासून उभारलेलं वैभव भल्याभल्याना तोंडात बोट घालायला लावते. व्यवसायाला साथ दिलेल्या या गायीचा फोटो आज त्यांच्या देवघरात आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय इमडे कुटुंबीय आपल्या दिवसाची सुरुवात करत नाहीत. या गायींच्या शेणापासून इमडेंनी एक कोटींचा टोलेजंग बंगला आपल्या रानात उभारला आहे. या बंगल्याला नावही ‘गोधन’ निवास दिलं आहे. घरावर या गायीचा आणि दुधाच्या किटलीचा पुतळा आहे. गावात शिरताच तो लक्ष वेधून घेतो. इमडेवाडीत नेहमीच गाड्यांची वर्दळ असते, ती फक्त प्रकाश इमडे यांचा गोठा पाहायला येणाऱ्या लोकांची. चार एकर शेतीत प्रकाश नेमाडे यांनी दोन एकरमध्ये मुक्त गोठा आणि आपला बंगला उभारला आहे. उरलेल्या दोन एकरमध्ये त्यांनी गायींसाठी हिरवी वैरण लावलेली आहे. प्रकाशबापू यांनी आपल्या एकमेव गायीवर 1998 साली या व्यवसायाला सुरुवात केला होता. आपल्याला मोठ्या कंपनीसारखा सचोटीने व्यवसाय करुन मोठं व्हायचं आहे ही जिद्द त्यांनी ठेवली होती. या एकाच गायीपासून त्यांनी आज जवळपास 150 गायी वाढवल्या आहेत. आपल्या गायीला गाभ राहिल्यावर होणारी एकही पाडी त्यांनी कधीच विकली नाही. त्यामुळं आजही त्यांच्याकडे 150 गायी आहेत. मूळ व्यवसाय सुरु केलेली लक्ष्मी 2006 साली गेल्यावर त्यांनी त्याच गायीच्या वंशावर ही वंशवेल वाढवत नेली आहे. आज त्यांच्या मुक्त गोठ्या अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चारा, पाणी, स्वच्छता, आरोग्य याची काळजी घेतली जाते. सध्याच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकाशबापूंनी प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांच्या गोठ्यात पंजाबमध्ये गायी जेवढं दूध देतात तेवढचं दूध देणाऱ्या गायी देखील आहेत.
सुरुवातीला पाणी नसताना प्रकाशबापूंनी टँकरने पाणी आणून गायींचा सांभाळ केला. पण आता त्यांनी शेतात एक मोठे शेततळे केले असून, त्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जनावरांना लागणारी वैरण बापू टेंडर काढून विकत घेतात. आज त्यांना जवळपास रोज चार ते पाच टन हिरवा चार लागतो. तेवढाच मुरघास विकत घेतात. दुधावरील जनावरांना मुरघास आणि दुसऱ्या गायींना हिरवा चार दिला जातो. बापूंच्या गोठ्यात इतक्या गायी असून कधीही साप, नाग, विंचू , बेंडकुळ्या दिसत नाहीत. याचे मजेशीर कारण सांगताना प्रकाशबापूंनी शेतात तीन बदके आणून ठेवली आहेत. ती गोठा आणि शेतात सातत्याने फिरत असतात. या बदकाच्या भीतीने गेल्या आठ ते दहा वर्षात त्यांच्या शेतात कधीही हे प्राणी दिसले नसल्याचे त्यांनी सांगितले. नेमाडेंनी उभारलेले हे वैभव पाहण्यासाठी रोज राज्यभरातून दूध व्यावसायिक इथे येऊन भेट देतात. त्यांना प्रकाशबापू सर्व पद्धतीचे मार्गदर्शन करत असतात.
गेल्या 20 वर्षांपासून बापू एक दिवसही कधी गोठा सोडून बाहेर गेले नाहीत. बापूंची पत्नी सिंधुताई, मुलगा विजय, सुनबाई मेघरानी आणि नातू हर्षद हे सर्वच या गोठ्यात राबत असतात. बापूंची सून एकटी 55 गायींच्या धारा काढत असे. आता गोठ्यात चार मजूर कामाला असले तरी बापूंचे कुटुंब देखील या गोठ्यात राबत असते. त्यामुळेच वर्षाला दुधाचे लाखोंचे उत्पन्न असूनही शेणातूनही दरवर्षी 12 लाख रुपये मिळतात. आता बापूंनी गायी वाढवण्यापेक्षा कमी गायींपासून जास्त दुधासाठीचे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली आहे. पूर्वी 25 लिटर दूध देणाऱ्या गायी 40 लिटरपर्यंत दूध देत आहेत. 
प्रकाश इमडेंनी जिद्दीनं आणि प्रामाणिक कष्ट करुन हा दूध व्यवसाय केला आहे. कमी भांडवलात वर्षाला लाखो रुपयांचे  हमखास उत्पन्न मिळू शकते असा सल्ला प्रकाश बापू इमडे यांनी दिला. त्यामुळेच त्यांच्या गोठ्याला भेट देणारा प्रत्येक तरुण जाताना प्रेरणा घेऊन जातो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button