एकेकाळी मजुरी केली, विहिरी फोडल्या, ट्रॅक्टरवर काम केलं, तोच मुलगा कष्टाचं चीज करून IAS झाला!
एका IAS अधिकाऱ्याचा जीवनप्रवास
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2022/12/IMG_20221223_174647-780x470.jpg)
एकेकाळी मजुरी केली, विहिरी फोडल्या, ट्रॅक्टरवर काम केलं, तोच मुलगा कष्टाचं चीज करून IAS झाला!
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
आजपर्यंत आपण अनेक अशा संघर्ष कथा बघितल्या आहेत ज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांनी शून्यातून आपलं आयुष्य घडवलं. असे अनेक IAS, IPS अधिकारी आहेत ज्यांच्या बालपणी त्यांना शिक्षणही घेण्याची आर्थिक परिस्थिती घरी नव्हती. तर अनेकांनी शेतात मजुरी करून आणि मिळेल ते काम करून लहानपणी शिक्षण घेतलं. आज आपण अशाच एका IAS अधिकाऱ्याचा जीवनप्रवास बघूया ज्याने लहानपणी शेतात मजुरी केली. एवढंच नाही तर त्याने लहानपणी ब्रेड आणि भाजीपाला विकून मिळालेल्या पैशातून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. वाचूया पूर्ण जीवनप्रवास..
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील ताडे या खेडेगावात राजेश पाटील यांचा जन्म झाला. वडील प्रभाकर पाटील हे शेतकरी. त्यांना अगदी थोडी जमीन. त्यामुळे इतरांच्या शेतात देखील मजुरी करावी लागायची. मुलाला शिक्षण द्यायला देखील त्यांची ऐपत नव्हती. पण मुलगा मेहनती होता. लहानपणीच त्याने आपली शिक्षणाप्रती असलेली आवड दाखवून दिली. खरंतर खेड्यातील मुलांना शाळेची आवड असतेच असं नाही. त्यातली त्यात मजुराच्या मुलांना तर क्वचितच शिक्षणाची आवड निर्माण होते. कारण त्यांची आर्थिक परिस्थितीच तशी बेताची असते.
पण राजेश मात्र वेगळा होता. त्याने शाळेचं शिक्षण घ्यायचं ठरवलं. त्यासाठी त्याने देखील लोकांच्या शेतात मजुरी केली. खूप कमी वयातच काम करण्याची सवय लागली. मजुरी करून येणारे पैसे जमा करून ठेवत. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. त्यांनी गावात पाव आणि भाजीपाला देखील विकला. त्यातून मिळालेले पैसे देखील जमा करून ठेवत. त्याच पैशात गावातच शिक्षण चालू होतं. वडिलांना जमीन म्हणजे एक छोटासा तुकडाच. त्यावर कसातरी कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे. वडिलांना देखील राजेश हातभार लावायचा.
राजेशने लहानपणी फक्त मजुरीचा केली असे नाही तर त्याने ट्रॅक्टरवर देखील काम केले आणि विहिरी देखील खोदण्याचे काम केलं. राजेश हा लहानपणी ढ विद्यार्थी होता. गावातही शिक्षणाचं वातावरण नव्हतं. पण गावातील शिक्षक आणि हुशार लोकांच्या सल्ल्याने त्याने आपल्यामध्ये अनेक बदल केले. खूप मेहनत करून स्वतःला अभ्यासात हुशार केलं. मित्रांनी आणि शिक्षकांनी खूप साथ दिली. राजेशने १० वी आणि १२ वी झाल्यानंतर ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं. पण तिथे देखील फीस भरण्यासाठी पैसे नसायचे. त्यावेळी देखील त्याने मजुरी करून कॉलेजची फीस भरली.
राजेशला कमी वयातच एक चांगलं अधिकारी होण्याचं मनात होतं. त्याला हे देखील माहिती नसायचं कि IAS काय असतं. राजेशने खूप मेहनत घेऊन स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. आयुष्यात एक चांगला अधिकारी व्हायचं हे डोक्यात होतं. समाजातील अनेक गोष्टी बदलायला हव्या असं वाटायचं. राजेशने MSC नंतर नोकरी करण्यासाठी आपण नाही हे ठरवलं. त्यामुळे आपण स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारीच व्हायचं असं मनाशी ठरलं होतं.राजेशने लोकांसाठी काम करायचं ठरवलं होतं. ग्रामीण भागात लोकांना कसं समस्यांना तोंड द्यावं लागत हे डोक्यात होतं. त्यामुळे हे बदलायचे असेल तर खूप वरच्या लेव्हलवर जावं लागेल असं डोक्यात होतं. तयारी करत करत हळू हळू IAS होण्याचा आत्मविश्वास येत गेला. आयएएस होण्यापूर्वी त्यांची २००० साली भारतीय सांख्यिकी सेवा आणि हवाई दलात त्यांची निवड झाली होती. त्यामुळे राजेशला UPSC करण्यासाठी अजून आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे IAS व्हायचंच ठरवलं.
पुण्यात यूपीएससीची तयारी केलेल्या राजेशने २००५ साली यूपीएससी परीक्षेत यश मिळवत IAS पदावर मजल मारली. राजेश हे ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहेत. राजेशची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये २००८ साली आलेल्या महापुरात राजेशने केलेल्या कामाचे देशभर कौतुक झाले होते. यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. राजेश यांनी लिहिलेलं ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.राजेश पाटील हे सध्या संचालक,सैनिक कल्याण पदावर आहेत. पूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून ते काम करत होते. शेतीत मजुरी करणारा पाव विक्रेता ते आयएएस असा आयुक्त पाटील यांचा प्रवास मोठा संघर्षमय व प्रेरणादायी असा आहे. तुम्हाला हा जीवनप्रवास कसा वाटला नक्की सांगा.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)