यशोगाथा

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व गुरुवर्य रामचंद्र चौरे गुरुजी…..

३० नोव्हेंबर २०२३ होय. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो ! हीच प्रार्थना..

शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्व गुरुवर्य रामचंद्र चौरे गुरुजी…..

HTML img Tag Simply Easy Learning    

अत्यंत संयमी, मितभाषी आणि मनमिळावू स्वभाव असणारे, नेहमी सर्वांना समजून घेणारे व समजावून सांगणारे, तितकेच प्रेमळ ज्यांना पंचक्रोशीत राम गुरुजी म्हणून ओळखतात. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी, विचार आणि कर्मांनीच होते, असे व्यक्तिमत्व इर्ला, ता. उस्मानाबाद येथील जीवन विकास विद्यालयात कार्यतत्पर असणारे सहशिक्षक रामचंद्र लक्ष्मण चौरे गुरुजी होत. त्यांचा जन्म इर्ला येथे दि. २ नोव्हेंबर १९६५ रोजी साधारण कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबातील ५ भावंडांमध्ये ते सर्वात लहान आहेत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. इयत्ता चौथीत असताना वडिलांचे छत्र हरवले आणि आर्थिक परिस्थिती अजूनच नाजूक होत गेली. जनावरांची देखभाल, शेती व मोलमजुरी करत असत. तरीही त्यांनी शिक्षणाची कास कधी सोडली नाही. अनेक वेळा शाळा सोडून देऊन गुरे सांभाळावी लागली. त्यांचे इयत्ता ७ वी पर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर ८-९ वी उस्मानाबाद येथील श्री छत्रपती हायस्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर लातूर येथील शिवाजी शाळेतून १९८३ साली दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झाले. घरच्या हलाखीच्या परिस्थितीतही त्यांची शिक्षणातील आवड बघून त्यांचे चुलते श्री. अंबादास चौरे उर्फ नाना यांनी पित्याचे छत्र इतकींची देखील ढळू दिले नाही आणि शिक्षणासाठी मदत केली. दहावीच्या निकाल लागण्या अगोदरच ते ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे कामासाठी गेले. त्यांनी या अगोदर ट्रकवर क्लिनर, टेलिफोन ऑपरेटर, मग बांधकाम कामगार असे कष्ट घेत बांधकामातील सेंट्रिंग काम करू लागले. कष्टातून पैसे जमवून गावाकडील वडिलोपार्जित शेती सावकाराकडून सोडवून घेतली. त्यानंतर शेतात बैल बारदाना वाढवला. बांधकामावर असताना अचानक एके दिवशी बिल्डिंगवरून ते खाली पडले. याची माहिती नानांना पत्राद्वारे कळविली. नानांनी ताबडतोब तार करून भिवंडीहून गावी बोलावून घेतले. ” तू नाही काम केले तर तुझी बायको मुलं उपाशी मरतील, अशी परिस्थिती नाही कारण अजून तुझे लग्न झालेले नाही, तेव्हा पुढचे शिक्षण घे आणि स्वतःच्या पायावर उभे रहा,” असा नानांनी त्यांना सल्ला दिला. मग सुरू झाला पुढचा संघर्ष. १९८७ साली अकरावीला प्रवेश घेतला. सन १९८९ मध्ये कळंबला एका संस्थेत दहावीवर डी. एड. ला प्रवेश चालू होता पण डोनेशन द्यावे लागणार होते. कमावलेले सर्व पैसे तर शेतीसाठी खर्च केले होते. मग आता काय करायचे ? नानांनी सल्ला दिला लग्न कर. ते पाहुणे मदत करतील. शिक्षणासाठी लग्न केले. नशिबाने बायकोही खंबीर साथ देणारी मिळाली. डी. एड. चे शिक्षण चालू झाले. आपला खर्च भागवण्यासाठी हे दोघे पती-पत्नी शनिवार-रविवार मजुरी करत असत.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

ऑगस्ट १९९१ ला डी. एड. पूर्ण झाले आणि सप्टेंबरपासून शिक्षक म्हणून इर्ला येथील जीवन विकास विद्यालयात रुजू झाले. सुरुवातीला केवळ २५०० रुपये पगार होता आणि त्यात संसाराबरोबर सतत आजारी असणाऱ्या मुलीच्या दवाखान्याचा खर्च. दवाखान्यासाठी पैसे कमी पडू नये म्हणून नोकरी लागल्यावर सुद्धा शनिवार-रविवार दोघांनीही शेतमजुरीची कामे केली. अगदी शेतात पाईप लाईन खोदण्याचे सुद्धा काम केले. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्यात संघर्ष असतोच पण व्यावसायिक आयुष्यात सुद्धा अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. कितीही समस्यांचा सामना करावा लागत असला तरी शिक्षणावरील आस्था जराही ढळू दिली नाही. त्यांनी सन २००१ मध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात बी. ए. पदवीसाठी प्रवेश घेवून २००४ मध्ये त्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला. लागलीच २००६ मध्ये बी. एड. पदविका प्राप्त केली. सन २००५ मध्ये गावातील शेतकरी तसेच गरजू लोकांना सहकारी तत्वावर आर्थिक मदत करता यावी यासाठी राजर्षी शाहू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, इर्ला येथे सुरू केली. सन २००३ ते २००८ या पतसंस्थेचे सचिव म्हणून ते काम पाहात असताना लक्षावधी रुपयांचा व्यवहार, काटेकोर हिशोब, तत्परता, प्रामाणिकपणा, चोखहिशोब ठेवून विश्वासार्हता कमावली. त्यांची सन २०१९ मध्ये अतिरिक्त झाल्यानंतर काक्रंबा येथील संजीवनी विद्यालयात २ वर्षे सेवा केली. सन २०२१ मध्ये पुन्हा इर्ला येथील जीवन विकास विद्यालयात रुजू झाले. शैक्षणिक क्षेत्रात १९९१ ते २०२३ या ३३ वर्षांच्या कार्यकाळात हजारो विद्यार्थ्यांना घडविले आणि त्यांच्यावर संस्कार केले. आज त्यांचे शेकडो विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात मग कोणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, फार्मासिस्ट, शिक्षक, उद्योग-व्यवसायात तर काही कंपन्यांमध्ये कार्यरत असल्याचे दिसून येते. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच शाळेच्या नावाला साजेल असे जीवनाला आकार देणारे शिक्षण त्यांनी दिले. आपल्या आयुष्यातील काही घटना, वेगवेगळे अनुभव यांची साथ घेत अनेक बोधकथांच्या माध्यमातून, माझा विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा न राहता जीवनातील कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची ताकत व कुवत त्याच्यामध्ये निर्माण व्हावी यावर ते अधिक भर देत असत. ते विद्यार्थ्यांना नेहमी उद्देशून म्हणायचे की, ना कुणाशी स्पर्धा असावी, ना कुणाचा द्वेष असावा, ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, ना कुणाला कमी लेखण्याची गुर्मी असावी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द मात्र विद्यार्थ्यांमध्ये असावी. थोडक्यात त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. एक कुटुंबकर्ता, शिक्षक व आदर्श नागरिक म्हणून काय कर्तव्य केली पाहिजेत. समाजाकडून मानसन्मान मिळवायचा असेल तर काय केले पाहिजे ? अतिशय साधी राहणीमान उच्च विचारसरणी, कष्ट हेच भांडवल या उक्तीप्रमाणे कायम कष्टप्राय जीवन, सतत मानसिक ताणतणाव असतानाही सर्वांशी शांतपणे वागणारे असे सर्वांचे आदरणीय राम गुरुजी. आपल्यासोबत असणारी व्यक्ती लहान असो की मोठी याचा विचार न करता सर्वांशी प्रेम, आपुलकी आणि आदराने वागणारे चौरे गुरुजी. शिका त्यांच्याकडून जीवनात यशस्वी होण्यासाठी किती अपार कष्ट करावे लागतात. आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात राहून एकवचनी, सत्यता, कर्तव्यनिष्ठ, निःस्वार्थपणा, प्रामाणिकपणा असे कितीतरी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये दिसून येतात. त्यांचे जीवन म्हणजे एक आदर्शवत असल्याचे दिसून येते. आचरण शुद्ध, सत्य वागणे, नीतिमत्ता साफ ठेवणे इत्यादी चारित्र्यसंपन्न करणाऱ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. वडिलधाऱ्याचा मान राखणे, आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शिक्षक म्हणून संपूर्ण कार्यकाळ त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःची मुले समजूनच शिकवले. हिंदी, विज्ञान, मराठी, इतिहास हे विषय त्यांनी पाचवी ते दहावी पर्यंतच्या मुलांना शिकवले.
आपल्या विषयाचा १०० टक्के निकाल लावण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करायचे. संकटांचा सामना करत, सतत प्रयत्नशील राहा, संघर्ष करा कारण संघर्ष विना जीवन व्यर्थ आहे, असे धडे ते आपल्या मुलांना देत. अडल्या-नडलेल्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करून आणि नंतर त्याची वाच्यताही न करणे यातून त्यांनी, ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागते, याची जाणीव आपल्या मुलांना करून दिली. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून ज्येष्ठ कन्या डॉक्टर व समाजसेविका, लहान कन्या उच्चशिक्षीत तर मुलगा इंजिनियर आहे. सुसंगत फाउंडेशन, पुणे यांच्याकडून दि. १६ जानेवारी २०२२ रोजी श्री. रामचंद्र लक्ष्मण चौरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनीता या दांपत्यांना ” आदर्श माता-पिता ” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचा सेवानिवृत्तीचा क्षण म्हणजे दि. ३० नोव्हेंबर २०२३ होय. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो ! हीच प्रार्थना…..!

HTML img Tag Simply Easy Learning    

शब्दांकन : प्रा. डॉ. महेश मोटे मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव संपर्क क्र. ९९२२९४२३६२

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button