दिन विशेष

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने व वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे, मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वर्चस्व निर्माण करणारे महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना पाटेकर.

नाना पाटेकर विशेष

*नाना पाटेकर*

HTML img Tag Simply Easy Learning    

जन्म : *१ जानेवारी १९५१*

HTML img Tag Simply Easy Learning    

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने व वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे, मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपले वर्चस्व निर्माण करणारे महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक व्यक्तिमत्त्व म्हणजे नाना पाटेकर.

HTML img Tag Simply Easy Learning    

नाना पाटेकर यांचा जन्म अलिबाग जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे झाला. त्यांचे बालपण तेथेच गेले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. या वयातच त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली आणि पुढे त्यांना काही काळ आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या कलेचा उपयोगही झाला. चित्रकलेचे रीतसर शिक्षण घ्यायचे, या उद्देशाने त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. चित्रकलेचे उपजतच भान असलेल्या या कलाकाराला खर्‍या अर्थाने मोहिनी घातली ती अभिनयाने. म्हणून महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी अभिनय करायलाही सुरुवात केली ती आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेतून. या स्पर्धेत त्यांनी ‘ससा आणि कासव’ या नाटकात काम केले. त्यांना याचा उपयोग बाहेरच्या जगातील अभिनयक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी झाला. महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नाना पाटेकर बाहेर पडले आणि त्यांना आविष्कार या नाट्यसंस्थेच्या ‘गौराई’ (१९७४) या नाटकात काम करण्याची संधी मिळाली. यातील अप्रतिम अभिनयामुळे त्यांना पुढे ‘पाहिजे जातीचे’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘महासागर’, ‘पुरुष’ आदी नाटकांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मिळाल्या. पण ते खर्‍या अर्थाने लोकप्रिय झाले, ते ‘पुरुष’ नाटकातील खलनायकी भूमिकेमुळे.

HTML img Tag Simply Easy Learning    

एकीकडे आपली नाटकाची कारकिर्द बहरत असताना नाना पाटेकर यांना चित्रपटांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे चित्रपटातील आगमन झाले, ते ‘आव्हान’ मधून. रंजना या अभिनेत्रीसोबत त्यांना एका आदर्शवादी तरुणाची भूमिका यात साकारायची होती. हा आदर्शवादी तरुण प्रस्थापित समाजव्यवस्थेत अन्यायाचा बळी ठरतो आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा ठरलेल्या आदर्शावर आधारित सामना करण्याऐवजी वाईट मार्गाला लागतो. सन्मार्ग ते वाईट मार्ग असा व्यक्तिरेखेचा प्रवास नाना पाटेकर यांनी ताकदीने रंगवला आहे. या चित्रपटामागोमाग नाना पाटेकर यांनी रंजना या अभिनेत्रीसोबतच ‘सावित्री’ हा चित्रपट केला. या चित्रपटापासूनच त्यांचा ‘नायक’ म्हणून बोलबाला व्हायला लागला. मराठी चित्रपटसृष्टीत थोडे स्थिरस्थावर होत असतानाच ‘गड जेजुरी जेजुरी’, ‘भालू’ हे चित्रपट त्यांनी आपल्या अभिनयकौशल्याने स्मरणीय केले. पण त्यांच्या अभिनयाचा खरा कस लागला तो जब्बार पटेल यांच्या *’सिंहासन’* या चित्रपटात. राजकीय व्यक्तिमत्त्वाची साकारणी त्यांनी या चित्रपटात कसलेल्या अभिनयाने यथार्थपणे केली. पण त्याहीपेक्षा त्यांचा संस्मरणीय ठरलेल्या चित्रपट म्हणजे ‘नागीण’ (१९८१). बेरड जमातीचे शोषण करणार्‍या पांढरपेशा समाजावर भाष्य करणार्‍या या चित्रपटात नाना पाटेकर यांनी निभावलेली भूमिका त्यांच्या व्यक्तित्वातील भारदस्तपणा दाखवून गेली.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुढील काळातील नाना पाटेकर यांचा महत्त्वपूर्ण चित्रपट म्हणजे ‘राघू मैना’ (१९८५). राजदत्त यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात त्यांनी दलित तरुणाची, राघवची भूमिका रंगवली. वर्णाधिष्ठित समाजव्यवस्थेवर प्रहार करत दलित वर्गाचे दु:ख जगासमोर आणणारा राघव त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयातून अभिव्यक्त केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला.

१९८६ मध्ये आलेला *”माफीचा साक्षीदार”* हा सत्य घटनेवर आधारित चित्रपटही नाना पाटेकर यांनी साकारलेल्या राघवेंद्र जक्कलच्या भूमिकेमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला. माणसाच्या रक्तासाठी चटावलेल्या व त्यासाठी निर्घृणपणे वागणारा राघवेंद्र नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयातून तंतोतंत साकारला. त्यांच्या अभिनयातून व्यक्त होत जाणारी हिंस्र पण थंड प्रवृत्ती प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी ठरली. राघवेंद्र या व्यक्तिरेखेच्या अंगांगात मुरलेला हिंस्रपणा नाना पाटेकर यांनी केवळ नजरेतून व्यक्त करून भूमिकेला अभिप्रेत असणारा क्रूरपणा दाखवून दिला.

‘सूर्योदय-एक पहाट’ हा नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला आणखी एक महत्त्वपूर्ण मराठी चित्रपट. दिप्ती नवल या हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीबरोबर त्यांनी साकारलेली भूमिका निश्‍चित लक्षात राहण्याजोगी होती.

*‘पक पक पकाक’* (२००५) मध्ये नानांनी साकारलेली भुत्याची भूमिकाही लक्षणीय ठरली. बायकोच्या हत्येनंतर गावामध्ये वैद्य असणारा संवेदनशील मनाचा सखाराम समाजापासून दुरावतो व जंगलात जाऊन राहतो. त्याचा अंतर्गत संवाद त्याला माणसांपासून दूर ठेवतो व जंगलाबाहेरील माणसांसाठी तो भुत्या होतो. तटस्थ भुत्या ते लहान चिखलूच्या सहवासात नव्याने उमलू लागलेले माणूसपण येथेपर्यंतचा सबंध प्रवास नानांच्या या भूमिकेतून सक्षमपणे रेखाटला गेला आहे. तर ‘देऊळ’ या चित्रपटात त्यांनी गावातील राजकारणी व्यक्तीची केलेली भूमिकाही प्रेक्षकप्रिय झाली.

नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निश्‍चित करण्यापूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता, तो ‘गमन’ या चित्रपटामधून. स्मिता पाटील आणि फारुख शेख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात नाना पाटेकर यांनी मध्यमवर्गीय तरुण साकारला. त्यानंतर त्यांनी ‘आज की आवाज’, ‘आवाम’, ‘सूत्रधार’, ‘अंकुश’, ‘प्रतिघात’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘यशवंत’, ‘थोडा रुमानी हो जाए’, ‘क्रांतिवीर’ या व यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांमधून अभिनय केलेला आहे.

हिंदी-मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका या व्यवस्थेविरुद्धचा लढा अधोरेखित करणार्‍या होत्या, सामाजिक बांधिलकीची भावना जपत जपतच देशभक्तीची भावनाही त्यांच्या काही भूमिकांमधून व्यक्त होताना दिसते. गुन्हेगारी प्रवृत्ती, मानसिकदृष्ट्या दुर्बल असणे, सक्षम पोलीस अधिकारी असणे, राजकारणी, सर्वसामान्य मध्यमवर्गीय तरुण अशा विविधांगी भूमिका रंगवणार्‍या नाना पाटेकर यांचा तीव्र संवेदनशील स्वभाव त्यांच्या अभिनयातून सातत्याने डोकावत राहतो.

नाना पाटेकर यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात सामाजिक बांधिलकीची भावनाही मनोमन जोपासलेली दिसते. म्हणूनच मुंबईत झालेल्या दंगलीच्या काळात त्यांनी मदत केली, तर कारगिल युद्धात प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन काम करू धजावले. बाबा आमटे यांच्या आनंदवनमध्ये काम करतानाही नाना तितकेच रमतात. या सर्व सामाजिक उपक्रमशीलतेतूनच त्यांची सामाजिक संबंधांबाबतची तळमळ सहजपणे उमटून जाते. त्यांनी ७७ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद जितक्या समर्थपणे भूषवले, तितक्याच समर्थपणे ते कोईमतूरच्या राष्ट्रीय रायडल्स स्पर्धेत यशस्वी ठरले.

नानांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. २०१३ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा त्यांच्या सर्वांगीण कामगिरीचा यथोचित सन्मान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

२०१४मध्ये त्यांनी *डॉ.प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो* या चित्रपटात शिर्षक भूमिका केली. या चित्रपटाला उत्तम यश लाभले. २०१६ साली *नटसम्राट* या मराठी चित्रपटात गणपतराव अर्थात अप्पा बेलवलकर या पात्राची भूमिका त्यांनी साकारली. समीक्षक आणि रसिक दोघांकडूनही हा चित्रपट उत्तम नावाजला गेला. २०१६ साली आलेल्या *द जंगल बुक* या इंग्लिश चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीतील *शेर खान* पात्राला त्यांनी आपला आवाज दिला.

नाना पाटेकर यांचं सामाजिक कामही मोठं आहे. प्रतिष्ठेचा राज कपूर पुरस्कार मिळाल्यावर ती रक्कम त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त लोकांसाठीच्या उपक्रमांना दिली. तसंच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांनाही त्यांनी मदत दिली आहे. २०१५ मध्ये नाना पाटेकर तसंच मकरंद अनासपुरे यांनी *नाम फाऊंडेशनची* स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांना मदत करत आहेत.

धारदार आवाज, रांगडे व्यक्तिमत्त्व, आपल्या कामाबद्दलची निष्ठा, अभिनयातील आत्मविश्‍वास आणि संपूर्ण व्यवस्थेकडे बघण्याचा विवक्षित दृष्टिकोन यांतून घडलेले नाना पाटेकर यांनी मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचे व आदराचे स्थान पटकावले आहे, हे निर्विवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button