श्रीशैलम येथे खेडगी परिवाराकडून सलग १५ तास लाडू वाटप कार्यक्रम….
लाखो भक्तांनी चाखली प्रसादाची चव...

श्रीशैलम येथे खेडगी परिवाराकडून सलग १५ तास लाडू वाटप कार्यक्रम….

लाखो भक्तांनी चाखली प्रसादाची चव…

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अक्कलकोटच्या खेडगी परिवाराने सलग पंधरा तास लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करून धर्मकार्य आणि प्रसाद वाटपाची परंपरा अबाधित ठेवली आहे. मागील ७५ वर्षापासून खेडगी परिवाराकडून हा उपक्रम अखंडपणे राबवला जातो. कै. चनबसप्पा खेडगी यांनी सुरु केलेला हा उपक्रम शिवशरण खेडगी यांनी अखंडपणे सुरू ठेवला. आणि आता माजी नगराध्यक्ष शोभाताई खेडगी व बसलिंगप्पा खेडगी आणि परिवाराच्यावतीने या उपक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले.

कोणतेही सण, समारंभ, उत्सव साजरा करण्याचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला जात असतो. मल्लिकार्जुन देवस्थान श्रीशैलम येथे लाडू वाटपाचा हा वारसा अक्कलकोटच्या खेडगी परिवाराकडून अत्यंत नेटाने पुढे नेताना दिसत आहे. त्यामुळे अक्कलकोटकर समाधान व्यक्त करत आहेत. यावर्षी बसलिंगप्पा खेडगी यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नियोजनबद्धपणे पंधरा तास लाडू वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्रीशैलम येथील पुजारी, भक्तगण व स्थानिक नागरिकांनी याबद्दल कौतुक आणि समाधान व्यक्त केले.

गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सलग १५ तास हा लाडू वाटपाचा कार्यक्रम अखंडपणे सुरू होता. गाईच्या तुपातील स्वादिष्ट बुंदीच्या लाडूची चव श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन भक्तांसह अक्कलकोटकरांना दरवर्षी चाखायला मिळते. एकदा सुरू केलेला कोणताही सामाजिक उपक्रम बंद करायचा नाही ही खेडगी परिवाराची अक्कलकोट तालुक्यात ख्याती आहे. त्यानुसार मागील 75 वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात आहे. पंधरा तास लाडू वाटपाच्या कार्यक्रमात लाखो भक्तांनी लाडूचा आस्वाद घेतला. या लाडू वाटपाच्या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष शोभाताई खेडगी, बसलिंगप्पा खेडगी यांच्यासह परिवारातील सर्व अबालवृद्ध सदस्य आणि अक्कलकोट येथील बसलिंगप्पा खेडगी मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.