१४५ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
धर्मसंकीर्तनसह पारंपारिक धार्मिक कार्यक्रम व पालखी सोहळ्याचे आयोजन -महेश इंगळे दि.७ एप्रिल पासून पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
१४५ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सवानिमित्त वटवृक्ष मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
धर्मसंकीर्तनसह पारंपारिक धार्मिक कार्यक्रम व पालखी सोहळ्याचे आयोजन -महेश इंगळे
दि.७ एप्रिल पासून पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ
श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील १४५ व्या स्वामी पुण्यतिथी महोत्सव निमित्त साजरे होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम सालाबादाप्रमाणे संपन्न होणार असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. यंदा
श्री स्वामी समर्थांची १४५ वी पुण्यतिथी मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी आहे.
यंदाचा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा कालावधी शके १९४५ शोभन संवत्सरे, चैत्र वद्य प्रतिपदा ते चैत्र वद्य त्रयोदशी शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ ते बुधवार दि.१९ एप्रिल २०२३ अखेर आहे. या पुण्यतिथी महोत्सवात स्वामींच्या नित्य उपासने सोबतच सालाबादाप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने नगरप्रदक्षिणा, नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, नित्य नामस्मरण दिनांक ७ एप्रिल ते १७ एप्रिल अखेर सकाळी ८ ते ११ या वेळेत विश्वस्ता श्रीमती उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली गुरुलीलामृत ग्रंथाचे सामुदायिक पारायण, दिनांक ११ एप्रिल ते १८ एप्रिल अखेर अखंड नामवीणा सप्ताह, व दिनेश मावडीकर (पुणे) यांचे सकाळ संध्याकाळी सनई वादन तसेच दिनांक ७ एप्रिल ते १७ एप्रिल अखेर दुपारी १२ ते ४ या वेळेत स्थानिक व परगावच्या भजनी मंडळांची भजन सेवा दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत धर्मसंकीर्तन महोत्सवात
दिनांक ७ एप्रिल रोजी पुण्यातील अर्चना राणे व सहकाऱ्यांची अभंगरंग सेवा, दि.८ एप्रिल रोजी हैद्राबाद येथील मुक्ती श्री, अन्वी श्री यांची कथ्थक सेवा, दि.९ एप्रिल रोजी सोलापुरातील रसिका व सानिका कुलकर्णी यांची भक्ती व सुगम संगीत सेवा, दि.१० एप्रिल रोजी मडगाव गोव्यातील ह.भ.प. सुहास वझे, मनस्वी नाईक व सहकाऱ्यांची चक्रीकीर्तन सेवा, दिनांक ११ एप्रिल रोजी वैराग येथील ह.भ.प.डॉ.रंगनाथ महाराज काकडे यांची प्रवचन सेवा, तसेच पुण्यातील डॉ.अनघा राजवाडे यांची भक्ती संगीत सेवा, दि.१२ एप्रिल रोजी अंबरनाथ येथील नीलिमा जोशी, रवींद्र झोपे व सहकाऱ्यांची भक्तीसंगीत सेवा, दिनांक १३ एप्रिल रोजी
औरंगाबादेतील ह.भ.प.सविता मुळे यांची कीर्तनसेवा, दिनांक १४ एप्रिल रोजी पुण्यातील विजयालक्ष्मी शिरगावकर यांची अभंगवाणी, तसेच सोलापुरातील विलासराव कुलकर्णी यांची भक्तीसंगीत सेवा, दिनांक १५एप्रिल रोजी इंदौर मधील तृप्ती कुलकर्णी, रजत पवार व सहकाऱ्यांची सुगम संगीत व भक्तिनृत्य सेवा, दिनांक १६ एप्रिल रोजी डोंबिवलीतील मानसी अत्रे व सहकाऱ्यांची कथक नृत्य सेवा, दि.१७ एप्रिल रोजी रोहा येथील ह.भ.प.अंजली कवळे यांची नारदीय कीर्तन सेवा इत्यादी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. दि.१८ एप्रिल श्री स्वामी पुण्यतिथी रोजी पहाटे २ वाजता श्रींची काकड आरती,
नगरप्रदक्षिणा, नामस्मरण, पहाटे ४ ते ६ लघुरुद्र, सकाळी ६ वाजता नामवीणा सप्ताह समाप्ती सोहळा, सकाळी ७ वाजता देवस्थानचे स्वामींना अभिषेक, सकाळी ११ वाजता मंदिर समिती पुरोहितांची नैवेद्य आरती, अक्कलकोट राजघराण्याचे स्वामींना महानैवेद्य आरती, दर्शन, दुपारी १२ ते ४ या वेळेत भाविकांना महाप्रसाद, तसेच दुपारी २ ते ४ या वेळेत कोल्हापूर ते अक्कलकोट इच्छापुर्ती पदयात्रेकरुंची कोल्हापूरच्या महाद्वार श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाची श्री वटवृक्ष मंदिर परिसरात भजन सेवा संपन्न होईल. सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत शहरातून पालखी सोहळा, दि.१९ रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत गोपाळकाला इत्यादी सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरेनुसार संपन्न होणार आहेत. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी परंपरेनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम, पालखी सोहळा संपन्न होणार आहेत. श्री स्वामी समर्थाचा पुण्यतिथी महोत्सव म्हणजे तमाम स्वामी भक्त व अक्कलकोट वासियांच्या स्वामी भक्तीचा लोकोत्सव आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी श्रींचे नित्य दर्शन व धार्मिक कार्यक्रमांबरोबर श्रवण, मनन, चिंतन, दर्शन, प्रसाद, पालखी सोहळा इत्यादी श्री.सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.