कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाची प्रगती साधत नावलौकिक वाढविला: मोहिते-पाटील
सेवापुर्तीनिमित्त गौरव ग्रंथाचे प्रकाशन व सन्मान सोहळा

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाची
प्रगती साधत नावलौकिक वाढविला: मोहिते-पाटील
सेवापुर्तीनिमित्त गौरव ग्रंथाचे प्रकाशन व सन्मान सोहळा

सोलापूर, दि.5- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात गेल्या पाच वर्षात कुलगुरूपदाच्या माध्यमातून डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाची 15 क्रीडांगणे, कौशल्य विकासाचे 145 अभ्यासक्रम, अतिशय भव्य अशी नूतन प्रशासकीय इमारत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा त्याचबरोबर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व पायाभूत सेवा-सुविधा देऊन या विद्यापीठाचा नाव देशभरात वाढविल्याचा गौरव विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या तथा गौरव समारंभ समितीच्या अध्यक्षा पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी काढले.

शुक्रवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्यात पद्मजादेवी मोहिते पाटील या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. फडणवीस, प्र-कुलगुरू डॉ. गादेवार, सिताराम रणदिवे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुलसचिव योगिनी घारे यांनी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या कार्यकाळाचा आढावा घेताना विद्यापीठाची भरपूर प्रगती झाल्याचे सांगितले. प्रारंभी विद्यापीठाच्या कॉफी टेबल बुकचे आणि कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस गौरव ग्रंथाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. मानपत्राचे वाचन डॉ. दत्ता घोलप यांनी केले. यावेळी रश्मी मोहोळकर, अमोल रणदिवे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. माया पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश पवार, डॉ. विष्णू शिखरे, सचिन गायकवाड, श्रेणिक शहा, मानसी फडणवीस यांनी कुलगुरू डॉ फडणीस यांच्या बद्दल मनोगत व्यक्त केले.

मोहिते-पाटील म्हणाल्या की, डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या माध्यमातून सोलापूर विद्यापीठास अतिशय कार्यक्षम, तडफदार, नाविन्यपूर्णता, कल्पकता तसेच संयमी, अभ्यासू अशा कुलगुरू लाभल्या. त्यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करताना विद्यापीठाचा विकास मोठ्या प्रमाणात केल्याचे आज पहावयास मिळतो. कुलगुरूपदाची जबाबदारी त्यांनी समर्थ व सक्षमपणे पेलून विद्यापीठाचा नावलौकिक देशात व जगभरात वाढविल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्र-कुलगुरू डॉ.गादेवार यांनी गेल्या आठ महिन्यात विद्यापीठाच्या विकासासाठी योगदान देण्याचे भाग्य मला लाभले. सोलापूरसारख्या ऐतिहासिक शहरात काम करण्याची संधी लाभली. यापुढे येणाऱ्या काळात उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये चांगले काम करत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. फडणवीस कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या की, कुलगुरूपदाची पाच वर्षे कसे गेली, हे कामाच्या व्यापात कळाले देखील नाही. प्रत्येक गोष्टीला सकारात्मकरित्या समजावून घेऊन काम केले, त्यामुळे विकासाचा टप्पा गाठता आला. जे काही केले, ते शंभर टक्के योगदान देऊन केले. सुरुवातीपासूनच समाजाशी जोडल्याने भाषा संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अध्यासन केंद्र, महात्मा बसेश्वर अध्यासन केंद्र असे खूप काही काम सहजरित्या शक्य झाले. सोलापुरातील लोकांची पण खूप मोठी मदत झाली. सीएसआर निधीच्या माध्यमातून मदत होत गेली. सोलापुरातील विद्यार्थी देखील खूप चांगले आहेत. त्यांची शिकण्याची वृत्ती व नवे काही करण्याची इच्छा ही खूप आहे. त्यामुळे विद्यापीठात खूप काही बदल करून विकास करणे शक्य झाले, याबद्दल सर्व संबंधित घटकांचे सहकार्य माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण राहिल्याचा उल्लेखदेखील कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. कुलगुरूपदाच्या शेवटच्या टप्प्यात काही लोकांकडून जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न झाला, पण तोही उच्च न्यायालयात टिकला नाही. आता राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयाकडून सदरील चौकशीचे आदेश रद्द करण्यात आल्याचे पत्र कालच प्राप्त झाले. यावरून चांगल्या कामाला नेहमी न्याय मिळतो, हे स्पष्ट झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे व प्रा. श्रुती देवळे यांनी केले तर आभार डॉ. अंजना लवंडे यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा सेवापुर्तीनिमित्त सन्मान करताना डॉ. पद्मजादेवी मोहिते पाटील, प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, सिताराम रणदिवे, वित्त व लेखाधिकारी सीए श्रेणिक शहा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपुर व अन्य.