पुस्तक प्रकाशन

समीर गायकवाड यांच्या लेखनात प्रामाणिक आणि सच्चेपणाचा स्वर – कुलगुरू डॉ.रजनीश कामत

मसाप जुळे सोलापूरचा उपक्रम

समीर गायकवाड यांच्या लेखनात प्रामाणिक आणि
सच्चेपणाचा स्वर – कुलगुरू डॉ.रजनीश कामत
———————————————————
मसाप जुळे सोलापूरचा उपक्रम
——————————————————–
सोलापूर  – लेखक समीर गायकवाड यांच्या खुलूस मधल्या काळोख्या जगात जगणार्‍या स्त्रियांचं सच्चेपण सतत जाणवत राहतं. त्यांच्या वाट्याला येणारं बकाल, नरक यातनांनी भरलेलं, नकोसं जग वाचकांसमोर अत्यंत प्रामाणिकपणे लेखक समीर गायकवाड यांनी आणलं आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात प्रामाणिक व सच्चेपणाचा स्वर आढळतो तर झांबळ ‘ मध्ये ग्रामीण जीवनाच्या विविध पैलूंवर, माणसांवर, त्यांच्या जगण्याच्या धारणावर, वृत्ती-प्रवृत्तीवर प्रकाश टाकला आहे. ग्रामीण जीवनाची परिपूर्ण अनुभूती हे पुस्तक वाचताना आपल्याला येते.” झांबळ ” मधील कथा गाव पांढरीतील गोष्टी अगदी रसाळ भाषेत सांगितल्या असून चित्रदर्शी भाषेमुळे सगळ्याच कथा रंजक वाटतात. मानवी जातीसमोर अनेक गंभीर स्वरूपाच्या मानसिक आणि सामाजिक समस्या उभ्या आहेत परंतु त्यांच्यावर अजूनही म्हणावे तेवढे लिखाण झालेले नाही. ते झाले पाहिजे, असल्याचं मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीश कामत यांनी व्यक्त केले.


महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्या वतीने लेखक समीर गायकवाड यांनी लिहिलेल्या झांबळ आणि खुलूस या दोन्हीही पुस्तकाचे प्रकाशन कुलगुरू डॉ.कामत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार होत्या. प्रारंभी दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे, मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी, कार्याध्यक्ष सायली जोशी लेखक समीर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी कोंडीचे उपसरपंच किसन भोसले, पोलीस पाटील मधुकर शिंदे, रहिवाशी शिवाजी नीळ, सोमनाथ राऊत, भरत नाना पाटील, मनोज निंबाळकर, आणि एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब गोरे यांचा मसाप जुळे सोलापूर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सहकुलसचिव डॉ.शिवाजी शिंदे यांनी झांबळ या पुस्तकावर आपले विचार मांडले.या पुस्तकात येणारी माणसं गावगाड्यातील, खेड्यातील माणसांच्या वृत्ती-प्रवृत्ती, वैभवसंपन्न खेड्यांना आलेलं बकालपण, नात्यातील दुरावा, हरवत चाललेली माणुसकी, मूल्यांची घसरण, स्त्रियांना सोसावा लागणारा सासुरवास, मानवी स्वभावाचे विविध पैलू, सोशिक व सहनशील स्त्रिया,साधी राहणारी पण स्वाभीमानी स्वभावाची माणसं याचे कथन करताना डॉ.शिंदे यांनी प्रसंगोचित कवितांचे दाखले देऊन रसिकांना मंत्रमुग्ध केले.


सायली जोशी या खुलूस पुस्तकावर बोलताना भावनाशील झाल्या. त्यांचे शब्द भावनेने ओथंबलेले होते. त्यांनी पुस्तकाशी एकरुप होऊन खुलूस या पुस्तकाची संपूर्ण तोंड ओळख करून दिली. पुस्तकातील विविध आशयसूत्राची मांडणी केली. समाजातील अशा दुर्लक्षित जीवन जगणाऱ्या महिलांप्रती सर्वांनी जागरूक होऊन एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोप करताना उपजिल्हाधिकारी शमा पवार म्हणाल्या की, रेडलाईट एरियातील
स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी खुलुस आणि झांबळ या दोन्ही पुस्तकाबद्दलची माहिती देऊन पुस्तक प्रकाशना मागची भूमिका प्रास्ताविकेतून स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारिणीचे सदस्य संतोष पवार यांनी केले तर आभार कार्यवाह रामचंद्र धर्मसाले यांनी मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख कार्यवाह गिरीश दुनाखे, उपाध्यक्ष श्रीकांत कुलकर्णी, कोषाध्यक्ष आनंद देशपांडे, कार्यकारणी सदस्य प्रशांत जोशी, सचिन चौधरी, स्वानंदी देशपांडे, डॉ माधुरी भोसले, अचला राचर्ला, यशवंत बिराजदार यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button