स्वामी कृपेचे ऋणी असल्याने कुटुंबासमवेत स्वामी चरणी नतमस्तक: आदेश बांदेकर
आदेश बांदेकर व कुटुंबीयांचा मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त महाराष्ट्राचे वैशिष्ट्य – आदेश बांदेकर


स्वामी कृपेचे ऋणी असल्याने कुटुंबासमवेत स्वामी चरणी नतमस्तक

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२३/८/२३) –
पंढरीच्या वारीप्रमाणे श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी हजारो स्वामी भक्त, दिंडी पालखी सोहळ्यांसह पायी चालत येत आहेत. ही बाब आम्हाला निदर्शनास आल्याने खूपच समाधान वाटले.या दिंडीत सर्व जाती-धर्माचे सर्व वयाचे लोक असतात. पंढरीच्या वारी प्रमाणे आता वटवृक्ष मंदिरात दिंड्यांसह येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे. या वारीमध्ये त्यांची जात, त्यांचा धर्म एकच असतो. ते सर्वजण त्या एकाच स्वामींची लेकरे असतात. या वारीत ते सदैव स्वामींचे नामस्मरण गुणगुणत चालतात. त्या नामस्मरणात दंग असल्यामुळे त्यांना चालण्याचे कष्टही वाटत नाहीत. त्यामुळे वटवृक्ष मंदिर आणि स्वामीभक्त हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य म्हणून उदयास येत असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेकलाकार व नाट्य कलाकार आदेश बांदेकर यांनी केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आदेश बांदेकर व सर्व कुटुंबीयांचा श्री स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी आदेश बांदेकर बोलत होते. श्री स्वामी समर्थ हे आता महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचेच ब्रम्हांडनायक आहेत. अनेक भक्तांवर त्यांची कृपा आहे तशी माझ्या व माझ्या कुटुंबियांवर पण स्वामी समर्थांची मोठी कृपा आहे. मी व माझे कुटुंबीय हे श्री स्वामी समर्थांचे भक्त असल्याने स्वामी कृपेने श्री स्वामी चरणी नतमस्तक होण्यासाठी संपूर्ण कुटुंबासह येथे आलो असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, प्रसाद पवार, मनोज कामनूरकर, विपूल जाधव आदींसह बांदेकर कुटुंबीय व स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – आदेश बांदेकर व कुटुंबीयांचा मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
