*सर्वसामान्यांचे उध्दारकर्ते कै. चनबसप्पा खेडगी*
दानशूर कै. चनबसप्पा खेडगी यांची आज मंगळवार दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे, यानिमित्त हा लेख प्रपंच..

*सर्वसामान्यांचे उध्दारकर्ते कै. चनबसप्पा खेडगी*

अक्कलकोट शहर व तालुक्यातील गोर- गरिबांना दुष्काळ परिस्थितीमध्ये अन्नदान व सर्व विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी आपलं ८५ वर्षांचं जीवन वाहिलेल्या दानशूर कै. चनबसप्पा खेडगी यांची आज मंगळवार दि. २६ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यतिथी साजरी होत आहे, यानिमित्त हा लेख प्रपंच..

मानवाच्या चारित्र्याची आणि व्यक्तिमत्त्वाची परिपूर्णता हे शिक्षणाचे उद्दिष्ट असते. शिस्त हा शिक्षणक्रियेचा परिपाक असावा. शिक्षा हा शिस्तीचाच एक भाग मानण्यात यावा. अचूकपणे दिलेली शिक्षा ही केवळ कायदेशीरच नव्हे, तर आवश्यक मानण्यात यावी असे म्हटले जाते.खेडगी यांनी निकोप व प्रबळ इच्छाशक्तीचा संपूर्ण विकास हे त्यांचे शिक्षणविषयक ध्येय ठेवले होते. कै. चनबसप्पा खेडगी यांना शिक्षणासाठी खूप पायपीट करावी लागली. तसेच तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली होती. त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले होते. चनबसप्पा हे व्यापारी क्षेत्रात ख्यातनाम ऑईल मिल मालक म्हणून प्रसिद्ध होते.खेडगी यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत अक्कलकोट च्या व पर्यायाने तालुक्याच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळींचा आणि अनेकविध लोककल्याणकारी अशा सुधारणांचा पाया घातला.

विद्यार्थी दशेमध्ये शिक्षण घेताना जे हाल सोसले त्याची जाणीव ठेवत अक्कलकोट तालुक्यातील सर्व विध्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे हि त्यांची तळमळ होती.सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. ते शिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे होते. शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे म्हणून त्यांनी मराठी व कन्नड भाषेचा संगम असलेल्या शहरात सन १९६९ साली त्यांनी अक्कलकोटच्या नवीन राजवाड्यात वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय सुरू केले. महाविद्यालयाच्या उभारणीनंतर विद्यार्थ्यांच्या गुणवतेला व विकासाला प्राधान्य देऊन त्यादिशेने प्रयत्न केले.महाविद्यालयाचे व विध्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन वाटचाल करीत होते. चनबसप्पा च्या पत्नी नीलव्वाबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. सन १९७० मध्ये महाविद्यालय आर्थिक संकटात सापडले होते. त्यावेळी आपली धर्मपत्नी नीलव्वाबाई यांच्या गळ्यातील सोने विकून सुमारे ५० हजार रुपयेची अनमोल मदत केली. हि मदत एक अविस्मरणीय ठरली आहे.त्यांनी तालुक्यातील गरीब व मध्यमवर्गीय मुलां – मुलींचीही शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून सी. बी. खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन केले होते .यामुळे आज महाविद्यालयाचा वटवृक्षात रूपांतर झाले आहे. चनबसप्पा यांनी भगीरथ प्रयत्नांनी खेड्यापाड्यांत ज्ञानगंगा नेऊन पोचविली. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते – सेवक या संस्थेत तयार झाले. अक्कलकोट शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने जनतेची झाली.

आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळविले; पण ते सारे त्यांनी गरीब, मध्यमसह दुःखी, कष्टी, दलित, अपमानित, उपेक्षित ह्यांच्या साह्यार्थ खर्चिले. त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती. माणुसकीने वागणे हाच मी माझा धर्म मानतो’, असे ते म्हणत. हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत निष्ठापूर्वक आचरिला. त्यांचे विचार उच्च सरणीचे होते.सामाजिक कार्यही मोठे आहे. गोरगरिबांना मदत करताना त्यांनी कधीही जात – धर्म पाळला नाही . सर्वधर्म समभाव पद्धतीने आलेल्या सर्व समाज बांधवाना सामाजिक, धार्मिक कार्यासाठी विविध प्रकारचे मोठी मदत केली आहेत.

तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर – तालुक्यातील गरीब, सर्वसामान्य जनतेना सन १९७२ च्या भीषण दुष्काळ परिस्थितीमध्ये जेवायला अन्न मिळत नव्हते त्यावेळी खेडगी नी पुढाकार घेऊन संपूर्ण तालुकावासीयांना झुणका – भाकर वाटप केली. तसेच शहरात सन १९९२- ९३ मध्ये भीषण पाणी टंचाई परिस्थितीमध्ये स्वतःचे ऑइल मिल बंद ठेऊन संपूर्ण शहर वासियांना सुमारे तीन महिने सहा मोठ्या टँकर द्वारे स्वखर्चाने मोफत पाणी वाटप केले. प्रतिवर्षी गुढी पाडवा दिवशी श्रीशैलम ( आंध्रप्रदेश ) येथील जागृत देवस्थान श्री मल्लिकार्जुन देवालयात सुमारे १२ ते १५ तास अनेक हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करत होते. नवरात्र महोत्सवात घटस्थापनासाठी अल्पशा दरात गोडेतेल वाटप करीत होते. अनेक मान्यवर संस्थांना देणग्या दिल्या . सध्या नावलौकिक मिळविलेल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास जुन्या जागेत भव्य अशी पत्राशेड उभी करून ताट – वाटी वगैरे भांड्याची मदत दिली होती. बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ समाधी मठात भाविकांच्या प्रदक्षिणासाठी सोय करून दिले होते. खासबाग गल्लीत श्री नागनाथ मंदिर उभी करून दिले. अक्कलकोट एस. टी. बसस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून सोय केली आहे. त्यावेळी सन १९९३ मध्ये मराठवाड्यातील काही भागात झालेल्या महाभयानक भूकंपाच्या वेळी भूकंपग्रस्थाना अन्नदान व कपडे वाटप केले होते. या व अशा अनेक प्रकारची मदत अक्कलकोट करांसह परगावच्या स्वामी भक्तगणासाठी केल्याची नोंद आहे. असे एक ना अनेक कार्य खेडगीनी करून समाजासमोर आदर्श उभा केला आहे. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दानशूर या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले.
त्यांनी अविरतपणे कार्य केले.त्यांचे हे कार्य तरुण पिढीस, विशेषतः व्यापारी सह शिक्षण संस्था चालक वर्गास, स्फूर्तिदायक व मार्गदर्शक ठरेल, असेच आहे. त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य केले. संस्थेची गंगोत्री आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात आसमंत दरवळणाऱ्या या सुगंधाने मन प्रसन्न होते. व समाधानाने मन प्रफुल्लित होते. सुगंध नाहीसा झाला तरी व्यक्तिमत्व त्यांचे कार्य तेजस्वी प्रकाशाप्रमाणे अद्यापही चिरंतन स्मृतीत आहे. त्यांचा समाज जीवनावर पडलेला ठसा जराही पुसट झाला नाही. त्यांचे जीवन अनेक पदरी रंगीत गोफाप्रमाणे होते. त्यांच्या जीवनातल्या विविध पैलूंचे अनुभव पाहिल्यास ते भाग्यवान होते. हाच धागा त्यांचे सुपुत्र संस्थेचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी जपत होते. आता त्यांची धुरा आजोबांचे नातू युवा नेते अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा शिवशरण खेडगी यांनी मोठ्या यशस्वीपणे सांभाळत आहेत.
—- विरुपाक्ष कुंभार.