स्वामी भक्तीसह भाविकांनी सकारात्मक विचारांचे बळ घेऊन जीवन जगावे – डॉ.उदय निरगुडकर
स्वामी दर्शनाअंती डॉ.उदय निरगुडकरांचे भाविकांप्रति मार्गदर्शनपर विचार

स्वामी भक्तीसह भाविकांनी सकारात्मक विचारांचे बळ घेऊन जीवन जगावे – डॉ.उदय निरगुडकर

स्वामी दर्शनाअंती डॉ.उदय निरगुडकरांचे भाविकांप्रति मार्गदर्शनपर विचार

(शब्दांकन – श्रीशैल गवंडी)

येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे अनेक भक्त आहेत. तसे श्री स्वामी समर्थ महाराज ही महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आहेत. म्हणून स्वामी भक्तांची संख्या महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आज प्रत्येकाला जीवनात काही ना काही अडचणी भेडसावत असतातच. या अडचणी भेडसावत असताना नकारात्मक विचारसारणीतून मुक्त होऊन सकारात्मक विचारसरणीने या अडचणींवर कसे मात करता येईल याचा सखोल विचार भाविकांनी करावा. स्वामी भक्तांनी आपल्याला जीवनात काय संधी आहेत हे प्रथम लक्षपुर्वक विचार करावे. जीवनात नाऊमेद करणार्या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण व काही दोष दिलेले आहेत. दोष विस्मृतीत सोडून गुणांची अंमलबजावणी केल्यास निश्चितच कोणत्याही संकटांवर मात करता येते. ज्याकरिता नेहमी स्वामी समर्थांचे नामस्मरण, नित्य मनन, चिंतन केल्यास मन शुद्ध होऊन जीवनाकडे बघण्याचा माणसाचा सकारात्मक दृष्टिकोन बनतो, त्यामुळे भाविकांनी स्वामीभक्ती सोबतच सकारात्मक विचारांचे बळ घेऊन जीवन जगावे असे सर्वश्रेष्ठ विचार झी.टीव्ही.चे संपादक व लेखक तथा मुंबईचे पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. डॉ. उदय निरगुडकर हे नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.उदय निरगुडकर यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान करून स्वामींचा आशिर्वाद दिला. या सत्काराप्रित्यर्थ स्वामी भक्तांप्रती मार्गदर्शनपर विचार मांडताना डॉ.निरगुडकर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.उदय निरगुडकर यांच्या व्यक्तीमत्वाप्रती बोलताना
डॉ. निरगुडकर हे टाटा, गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये २० वर्षे आयटी तज्ज्ञ वक्ते म्हणून काम करताना जागतिक पातळीवर जगातील जवळपास ४० देशातील नागरिकांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. सध्या झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून काम करताना त्यांच्या सेवेचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. पत्रकारितेतील पदार्पण असो वा डॉक्टरांचा ‘उदय’ आणि उदयचा डॉ. उदय निरगुडकर होण्यात श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशिर्वादाची व त्यांच्या पत्नी डॉ. सुपर्णांच्या आधाराची मात्रा त्यांच्या करीता भक्कम कणा ठरली आहे असे बोलून डॉ.उदय निरगूडकर यांच्या पुढील जीवन वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, सिध्देश्वर बॅक प्रशासन अधिकारी मिलिंद लिगाडे, शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, प्रसाद सोनार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, स्वामीनाथ लोणारी, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.उदय निरगुडकर यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, मिलिंद लिगाडे, शिवशरण अचलेर व अन्य दिसत आहेत.
