खेडगी महाविद्यालयाच्या दोन मुलीची अंधाच्या क्रिकेट स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात निवड
07 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान कर्नाटकातील हुबळी या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्या रवाना झाल्या.

खेडगी महाविद्यालयाच्या दोन मुलीची अंधाच्या क्रिकेट स्पर्धेच्या महाराष्ट्र संघात निवड

अक्कलकोट,
ग्रामीण भागातील मुलींमध्ये गुणवत्ता असते त्यांना योग्य संधी मिळाली पाहीजे. ग्रामीण त्यातही अंध मुलींनी गुणवत्तेवर सी. बी. खेडगी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले, असे मत अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी व्यक्त केले. खेडगी महाविद्यालयाच्या दोन मुलींची अंध मुलींच्या क्रिकेट महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला त्यावेळी चेअरमन खेडगी बोलत होते.
क्रिकेट असोसिएशन फोर दि ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निवड शिबीरामधून बी.ए.भाग एक मध्ये शिकत असलेली कु. श्रुती संजय सुरवसे व ११ वी कला या वर्गात शिकणारी कु. अस्मिता आमोघसिध्द बनसोडे या दोन मुलींची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली. त्यांचे पुण्यात प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले. दि 07 ते 12 जानेवारी 2024 या दरम्यान कर्नाटकातील हुबळी या ठिकाणी आयोजित राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्या रवाना झाल्या. ग्रामीण भागातील व अंध असूनही या मुलींनी घेतलेली भरारी कौतुकास्पद असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. याच कार्यक्रमात लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून महाविद्यालयातील हणमंत मोरे, बसवराज तोडकरी व खेमसिंग राजपूत या अंध विद्यार्थ्यांचा जागतिक ब्रेल दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या दोन्ही मुलींच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.सी.आडवीतोट यांनी भूषविले तर शुभेच्छा देण्यासाठी उपप्राचार्य प्रा.बी. एस. चडचण, महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.गणपतराव कलशेट्टी यांनी केले तर इतिहास विभाग प्रमुख प्रा. विलासराव अंधारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. किशोर थोरे यांनी केले.
