वीस वर्षांच्या लढ्याला वीस दिवसात न्याय दक्षिणच्या तहसीलदारांनी माजी सैनिकाची वणवण थांबवली
द. सोलापुर, ताः २७ कुंभारी, तालुका दक्षिण सोलापुर येथील ७५ वर्षीय शेतकरी तथा माजी सैनिक महादेव कांबळे यांच्या सातबारा उताऱ्यावरील भूसंपादन कार्यवाहीची मागील २० वर्षापासुन असणारी पोकळ नोंद दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाने अवघ्या २० दिवसांत कमी करून एका ज्येष्ठ नागरिकास दिलासा दिला आहे सन २००५ मध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कुंभारी येथे जलसंधारण विभागाकडून तलाव निर्मितीसाठी काही गटांचे भूसंपादन झाले.
त्याकरीता जलसंधारण विभाग, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी सोलापूर यांचे नावे कुंभारी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी तडजोडीने खरेदी घेण्यात आल्या. दरम्यान आजूबाजूच्या इतर शेतकरी यांच्या ७/१२ वर ‘भूसंपादन कार्यवाही चालू आहे ‘असा शेरा मारण्यात आला. तलावाचे काम पूर्ण झाले पण भारतीय सैन्यदलात देशाची सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले महादेव रामचंद्र कांबळे यांच्या मालकीच्या ७/१२ वर संबंध नसताना सन २००५ मध्ये “भूसंपादन कार्यवाही चालू आहे” हा शेरा पडला. आणि तेव्हापासुन गेली तब्बल 20 वर्षे त्यांना सदर जमीन ना विक्री करता येत होती, ना कुटुंबीयांना आपसात वाटप करून घेता येत होती, ना त्यावर कर्ज मिळत होते, ना त्या जमिनीत कायमस्वरूपी सुधारणा करण्यासाठी मार्ग उरला होता तो फक्त ७/१२ चा कागद आणि त्यावरील भूसंपादनचा पोकळ शेरा. वर्षानुवर्षे अर्ज देऊन आणि हेलपाटे घालून काम होत नाही म्हणून हतबल झालेले ७५ वर्षीय कांबळे यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांचेकडे अन्नपाणी त्याग करून सहकुटुंब उपोषणास बसण्याची परवानगी मागितली त्याबरोबर सर्व चक्रे जोरात फिरले. विषयाचे गांभीर्य ओळखून तहसीलदार किरण जमदाडे यांनी ग्राम महसूल अधिकारी समाधान काळे, मंडल अधिकारी संतोष फुलारी यांचा अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे यांची पडताळणी करून कांबळे यांच्या 7/12
उताऱ्यावरील “भूसंपादन कार्यवाही चालू आहे” हा शेरा कमी केला. त्यामुळे कांबळे यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांचा प्रशासनावर विश्वास दृढ होत आहे.चौकट…
जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन समन्वयन अधिकारी संतोष देशमुख, प्रांत अधिकारी सुमित शिंदे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा व तहसीलदार किरण जमदाडे यांनी योग्य मार्गदर्शन केल्याने मंडल अधिकारी व तलाठी यांना पुढील कारवाई करणे सोयीचे झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
कोट…
भूसंपादन चा शेरा म्हणजे काळ्या दगडावरील रेघ असते. ती कमी करणे शक्य नाही असे सांगून प्रशासनातील काहींनी मला भिती घातली होती. पण आज महसूल प्रशासनाने मला योग्य न्याय दिला असून मी व माझे कुटुंबीय यासाठी समाधानी आहोत.
– महादेव कांबळे, कुंभारी
फोटो ओळी :
महादेव कांबळे यांना दुरुस्त 7/12 ची प्रत देताना तालुका दक्षिण सोलापूरचे तहसीलदार व ग्राम महसूल अधिकारी
Back to top button
×
No WhatsApp Number Found!