तळेगाव दाभाडे येथील सर्व होर्डिंग्ज अनधिकृतच ; नगर रचना विभागाची माहिती
तळेगांव दाभाडे (प्रतिनिधी): मुंबईच्या घाटकोपरमध्ये कोसळलेल्या महाकाय होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या हद्दीतील होर्डिंग बाबत आढावा घेतला. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून देखील शहरातील सर्व होर्डिंग बाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये शहरातील सर्व होर्डिंग अनधिकृत असल्याचे निदर्शनास आले. कोणताही होर्डिंग कायदेशीरपणे लावला नसल्याची माहिती नगररचना विभागातील सहाय्यक नगररचनाकार गणेश कोकाटे व विरेंद्र नारगुंडे यांनी दिली.

मागील वर्षी तळेगाव दाभाडे हद्दीत सर्व एकूण 27 होर्डिंग अनाधिकृत होते.वरीष्ठांकडून आलेल्या आदेशाप्रमाणे फक्त 5 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करून बाकी सर्व विनापरवानगी कायम त्याच जागेवर स्थिर आहेत.यावर्षी त्यामध्ये 3 अनाधिकृत होर्डिंगची वाढ झाल्याने आजमितीस अनधिकृत होर्डिंगची एकूण संख्या 32 झाली आहे.

याबाबत काही होर्डिंगचे मालकांनी परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केले होते.त्यामध्ये असलेल्या कागदपत्राच्या त्रुटीची पूर्तता मालकांकडून न झाल्याने तळेगावातील 100 टक्के होर्डिंग अनधिकृत असल्याचे नगर रचना विभागाच्या प्रशासनाने सांगितले.
