Kiwale : घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस चोरून काळा बाजार करणाऱ्या इसमावर अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
निगडी (प्रतिनिधी): घरगुती सिलेंडरमधून गॅस काढून तो लहान सिलेंडरमध्ये भरून त्याची काळ्या बाजारात वाढीव दराने विक्री केल्याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने किवळे गाव येथे कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 20) दुपारी जय भवानी गॅस सर्व्हिस या दुकानात करण्यात आली.
विष्णुकांत श्रीधर मोरे (वय 27, रा. किवळे गाव, मूळ रा. कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार अजित कुटे यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी मोरे याने त्याच्याकडे कसलाही परवाना नसताना घरगुती वापराच्या सिलेंडरमधून रिफिलच्या साहाय्याने कोणतीही खबरदारी न घेता लहान सिलेंडरमध्ये काढून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करत दुकानातून आठ घरगुती वापराचे सिलेंडर आणि 23 लहान सिलेंडर तसेच गॅस रिफील करण्याचे इतर साहित्य असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.