Urse : तक्रार दाखल न करता गैरवर्तन केल्या प्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या विरोधात उर्सेच्या महिला उपसरपंचांची राज्य मानव हक्क आयोगात धाव

तळेगांव दाभाडे (प्रतिनिधी): तक्रार दाखल न करता गैरवर्तन केल्याप्रकरणी शिरगांव-परंदवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांच्या विरोधात उर्सेच्या महिला उपसरपंच सविता राऊत यांनी राज्य मानव हक्क आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

सविता राऊत यांनी दाखल केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 20 मे 2024 रोजी मी उर्से येथील सी.आय.ई. इंडिया कंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाविषयी पत्रकार परिषद घेतली. तसेच पत्रकार परिषदेनंतर मला सी.आय.ई. कंपनीच्या व्यवस्थापनाची बाजू ऐकून घ्यायची होती, त्यामुळे तिथे थांबावे लागले.त्यानंतर आम्ही तेथून निघून जात असतांना अचानकपणे सी.आय.ई. कंपनीच्या गेटमधून 20 ते 25 जणांचा घोळका आमच्या अंगावर धावून आला.आमच्याबरोबर असणारे प्रदिप नाईक (सचिव, माहिती अधिकार महासंघ, महाराष्ट्र राज्य) व प्रतिक भालेराव (सामाजिक कार्यकर्ते) व माझे पती किरण राऊत यांना दमदाटी केली गेली.

यावेळी जमावाने कोठून प्रदूषण होत आहे, कसे होत आहे,कोणी सांगितले असा प्रश्नांचा भडीमार करत दमदाटी करू लागले. तसेच,आमच्याशी अश्लील भाषेत बोलू लागले. तुम्हा सर्वांची गावातून धिंड काढली पाहिजे,असे म्हणू लागले.याव्यतिरिक्त आमच्यावर सी.आय.ई. कंपनीच्या व्यवस्थापनाने अनेक खोटे आरोप केले. अचानकपणे 20 ते 25 लोक हे कोठून आले आहे, हे कंपनीच्या गेट समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तपासून या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय द्यावा.मला व माझ्याबरोबर प्रदिप नाईक (सचिव, माहिती अधिकार महासंघ, महाराष्ट्र राज्य) व प्रतिक भालेराव (सामाजिक कार्यकर्ते) व माझे पती . किरण राऊत यांना कंपनीकडून जिवीतास धोका आहे. तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांची सखोल चौकशी झाली पाहिजे असे निवेदनात म्हटले आहे.


वरीष्ठ पोलीस निरीक्षक हे कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कामगारांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत का? दि. 20 मे रोजी त्यांनी आमची तक्रार का घेतली नाही, याचा खुलासा त्यांनी द्यावा,अशी मागणी राऊत यांनी निवेदनातून केली आहे.